नागपूर: माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण(Ashok Chavan) यांनी भाजपमध्ये (BJP) पक्ष प्रवेश केल्याने सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) वेगवान घडामोडी घडत आहेत. अशोक चव्हाण यांच्या पाठोपाठ काँग्रेसमधील (Congress) अनेक बडे नेते हे काँग्रेससोडून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आणि कुजबुज सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. अशातच विदर्भ, मराठवाड्यातील काँग्रेस पक्षात देखील मोठ्या राजकीय चर्चा रंगत असल्याचे चित्र आहे. असे असतांना नागपूर पश्चिम मतदारसंघाचे काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांनी आम्ही काँग्रेस सोबत असल्याचे स्पष्ट केले आहे. तर अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाचा मराठवाड्यावर फारसा परिणाम होणार नसल्याचे आमदार प्रज्ञा सातव (Pradnya Satav) यांनी स्पष्ट केले आहे. 


.... म्हणून भाजपमध्ये चाललोय असा अंदाज बांधणे योग्य नाही 


विधानसभा निवडणुकीला अजून आठ महिने आहे. तेव्हा नेमकं काय होणार हे आत्ताच विचारणार असाल, तर मला वाटते हे योग्य नाही. असे सूचक वक्तव्य नागपूर पश्चिम मतदारसंघाचे काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांनी केले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत माझे शालेय जीवनापासून मैत्रीपूर्ण संबंध आहे. म्हणून मी भाजपमध्ये चाललोय, असा अंदाज बांधणे ही योग्य नसल्याचे आमदार विकास ठाकरे म्हणाले. त्यामुळे जरी विकास ठाकरे आणि इतर काँग्रेस आमदार सध्या अशोक चव्हाण यांच्या सोबत जाणार नसल्याचे सांगत असले, तरी विधानसभा निवडणुकांच्या आधी असेच पक्षांतर होईल का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. 


अशोक चव्हाण प्रदेश अध्यक्ष असताना मी शहर अध्यक्ष होतो. त्याच अनुषंगाने मी बाळासाहेब थोरात, माणिकराव ठाकरे सर्वांसोबत काम केले आहे. मी अशोक चव्हाण सोबत जाणार, असे मी कधीही बोललो नाही. त्यामुळे प्रसार माध्यमांनी अशा बातम्या देऊ नये. असे देखील विकास ठाकरे म्हणाले. 1985 मी काँग्रेस मध्ये आहे. एवढे वर्ष काम करून पक्ष बदलणे शक्य होणार नसल्याचे देखील ठाकरे म्हणाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राजकारणाच्या आधी पासून चांगले संबंध आहे. आमची शालेय जीवनापासून मैत्री आहे. त्यात राजकारण कशाला आणता. फडणवीस यांच्या सोबत संबंध आहे म्हणून मी भाजपमध्ये चाललोय, असा अंदाज बांधणे योग्य नसल्याचे काँग्रेस आमदार विकास ठाकरे म्हणाले.


शेवटच्या श्वासापर्यंत काँग्रेससोबत- आमदार डॉ. प्रज्ञा  सातव


विदर्भाप्रमाणेच अशोक चव्हाण यांचा भाजपप्रवेशा नंतर अनेक अफवा आणि राजकीय चर्चेना उधाण आले आहे. मराठवाड्यावर अशोक चव्हाण यांचे बऱ्यापैकी प्रभुत्व राहिले आहे. मात्र अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाचा मराठवाड्यावर फारसा परिणाम होणार नसल्याचे मत आमदार डॉ. प्रज्ञा  सातव यांनी व्यक्त केले आहे. अशोक चव्हाण यांच्या सोबत जाणारे दोन ते तीन आमदार सोडले तर मराठवाड्यावर फारसा त्यांचा जाण्याचा परिणाम होणार नाही. हिंगोली जिल्ह्यांमध्ये मागील अनेक वर्षापासून सातव साहेबांनी या ठिकाणी काम केलेल आहे. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यांमध्ये फार काही फरक पडणार नसल्याचे प्रज्ञा सातव म्हणाल्या. सातव परिवार मागील 40 वर्षापासून त्या ठिकाणी आहे. त्यामुळे एकही कार्यकर्ता कुठेही हाललेला नाही. सातव परिवाराला गांधी परिवाराचा अतिशय निकटवर्तीय परिवार आणि एकनिष्ठ राहिला आहे.  त्यामुळे इथे काही एनर्जी लावून उपयोग होणार नाही. म्हणूनच अशोक चव्हाण यांच्याकडून मला कुठलेही प्रकारचा फोन आला नसल्याचे देखील सातव म्हणाल्या.


काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितला आहे की, आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये काही जे तुला करता येईल त्यासाठी लक्ष देत रहा. हिंगोली जिल्ह्याचे अशोक चव्हाण हे समन्वयक झाले होते. परंतु हिंगोली जिल्ह्याचे समन्वयक झाल्यानंतर ते एकदा सुद्धा हिंगोलीत आले नाही. नुकतेच ते तिकडे गेलेले आहेत त्यामुळे पुढील प्लॅनिंग कशी करायची त्या संदर्भात प्रदेश अध्यक्षांसोबत माझे बोलणं सुरू असल्याचे देखील सातव म्हणाल्या. अशोक चव्हाण यांच्यावर कुठलातरी दबाव असेल. त्यामुळेच ते तिकडे गेले असावेत. कारण अनेक नेते आपण बघतोय, अगोदर भाजपवर टीका करतात  आणि दुसऱ्या दिवशी ते भाजपमध्ये दिसतात. माझं सोनिया गांधी यांच्याशी बोलणं झालेला आहे. मी आपल्या पतीप्रमाणे शेवटच्या श्वासापर्यंत काँग्रेससोबत असल्याचे त्यांना कळवले असल्याचे देखील आमदार डॉ. प्रज्ञा  सातव म्हणाल्या. 


इतर महत्वाच्या बातम्या