नाशिक : दुसरे महायुद्ध आणि भारत-पाकिस्तान युद्धात अमूल्य कामगिरी बजावलेले डकोटा हे लढाऊ विमान तब्बल 75 वर्षांनंतर फिनिक्स भरारी घेणार आहे. हवाई दलाने या विमानाचे आधुनिकीकरण केले असून, बंगळुरुतील एअरो इंडिया शोमध्ये हे विमान कवायती सादर करणार आहे. व्हिंटेज ठेवा म्हणून हवाई दल या विमानाची जपणूक करणार आहे.
दुसरे महायुद्ध आणि भारत-पाकिस्तान युद्धात अमूल्य कामगिरी बजावलेले डकोटा हे लढाऊ विमान आज नाशिकच्या ओझर विमान तळावर दाखल झालं आहे. हवाई दलाने या विमानाचे आधुनिकीकरण केले आहे.

युनायटेड किंग्डम अर्थात इंग्लंडमध्ये निर्मिती झालेल्या डकोटा विमानाने दुसऱ्या महायुद्धासह 1947-48 मध्ये भारत-पाकिस्तान युद्धातही महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. तत्कालीन रॉयल इंडियन एअर फोर्समध्ये डकोटाचे खास महत्त्व होते. इंग्रजांनी भारत सोडल्यानंतर भारतीय हवाई दलाकडेच यातील काही विमाने होती.

मात्र, काळाच्या ओघात त्यांचा वापर बंद झाला. या विमानांची देखभाल-दुरुस्ती करतानाच त्यात अपग्रेडेशन करण्याच्या हालचाली गेल्या तीन-चार दशकांपूर्वी सुरू झाल्या. अखेर यात यश आले असून, एक डकोटा विमान फिनिक्स भरारीसाठी सज्ज झाले आहे. हे विमान येत्या 20 ते 24 फेब्रुवारीदरम्यान बेंगळुरु येथे होणाऱ्या एअरो इंडिया-2019 शोमध्ये सहभागी होणार आहे. त्यामुळे हे विमान यंदाच्या शोमधील आकर्षणाचा केंद्रबिंदू राहणार असल्याचे विंग कमांडर अनुपम बॅनर्जी यांनी सांगितले.

काय आहे डकोटाचा इतिहास

डकोटा हे लढाऊ विमान आहे. 580 हजार यूरो एवढी या विमानाची त्यावेळी किंमत होती. या विमानासाठी तत्कालीन इंग्रज सरकारने काही भारतीय वैमानिकांना विशेष प्रशिक्षण दिले होते. 1930 मध्ये तत्कालीन रॉयल इंडियन एअर फोर्समध्ये ते दाखल करण्यात आले होते. लडाख आणि उत्तर पूर्व भागातील संरक्षणासाठी हे विमान उपयुक्त ठरले. दुसऱ्या महायुद्धात जवान किंवा शास्त्रज्ञांची वाहतूक करण्यात हे विमान अपयशी ठरले होते. पण, 1947 मध्ये पहिल्या भारत-पाक युद्धात शीख रेमिजेंमटच्या काही जवानांना या विमानाद्वारे श्रीनगर येथे नेण्यात आले होते.