नाशिक : आदिवासी मतदार मोठ्या प्रमाणात असलेला दिंडोरी मतदार संघ पुर्वी मालेगाव मतदार संघ म्हणून ओळखला जात होता. या मतदार संघात पूर्वी कॉंग्रेस आणि जनता दलाचा बोलबाला राहिलेला आहे. परंतु गेल्या तीन निवडणूकांपासून हा मतदार संघ भाजपच्या हरिश्चंद्र चव्हाण यांच्या ताब्यात राहिला आहे. 2004 मध्ये या मतदार संघातून मालेगाव वगळण्यात येऊन तो दिंडोरी मतदार संघ म्हणून ओळखला जाऊ लागला.
या मतदार संघात एकुण 15 लाख दोन हजार 35 मतदार आहेत.या मतदार संघात सहा विधानसभा मतदार संघ येतात. यात दिंडोरी, कळवण-सुरगाणा, चांदवड, नांदगाव, येवला, निफाड या मतदार संघाचा समावेश असून येथे माकपचा 1, भाजपाचा 1, शिवसेनेचा 1 आणि राष्ट्रवादीचे तीन आमदार निवडून आले आहेत.
2014 चा निकाल
2014 च्या लोकसभा निवडणूकीत हरिश्चंद्र चव्हाण यांना 5,42,784 मतं मिळाली होती. तर राष्ट्रवादीकडून अनपेक्षितपणे डॉ.भारती पवार उमेदवारी मिळाली होती. भारती पवार यांना 2,95,165 तर माकपच्या हेमंत वाकचौरे यांना 72,599, बसपाच्या शरद माळी यांना 17,724 आणि आम आदमी पक्षाच्या ज्ञानेश्वरी माळी यांना 4,067 मतं मिळाली होती.
गेल्या तीन निवडणूकांत सतत निवडून येणारे हरिश्चंद्र चव्हाण हे पुर्वी राष्ट्रवादीमध्ये होते. त्यांनी भाजपत प्रवेश केला आणि लोकसभेत निवडून गेले, नाशिक जिल्हयात शिवसेनेची बऱ्यापैक ताकद असल्याने त्याचं नेहमी चव्हाण यांना पाठबळ मिळालं आहे. शिवाय पुर्वी राष्ट्रवादीत असल्याने त्याचा फायदा त्यांना सतत होत राहिला.
तीन वेळा खासदार म्हणून निवडून आलेल्या हरिश्चंद्र चव्हाण यांनी मतदार संघात फारशी काम केली नसल्याने मतदार सांगतात. त्यामुळे मतदार त्यांच्यांवर नाराज होते आणि आत्ताही आहेत. परंतु 2014 च्या निवडणुकीवेळी त्यांना मोदी लाटेचा फायदा झाला, त्यामुळे ते निवडून आले.
दिंडोरी मतदार संघ आदिवासीबहुल असल्याने येथील आदिवासींचा महत्वाचा वनजमिनीचा प्रश्न, सिंचनाचा प्रश्न, कांद्याचा प्रश्न प्रश्न अद्याप सुटू शकले नाहीत. चव्हाण मतदार संघातील सर्वात मोठे शहर असलेल्या मनमाड परिसरात एकही मोठा प्रकल्प आणू शकले नाहीत. तसेच बेरोजगारीचा प्रश्नदेखील सोडवू शकलेले नाहीत. त्यामुळे सध्य परिस्थितीला मतदारांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
चव्हाण यांचा मतदारसंघात दांडगा संपर्क आहे. सर्वच पक्षात असलेल्या नेत्यांशी मित्रत्वाचे संबंध असल्याने त्याचा फायदा त्यांना सतत होत आलेला आहे. त्यातच आदिवासी भागात त्यांच्यासारखा प्रबळ उमेदवार अन्यपक्षात नसल्याने त्याचाही प्रभाव मतदारांमध्ये पडत असल्याने निश्चितच त्याचा फायदा त्यांना होत आलेला आहे.
या निवडणुकीतील संभाव्य उमेदवार
2019 च्या निवडणूकीसाठी राष्ट्रवादीने भाजपाकडून हा मतदार संघ आपल्याकडे खेचण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. त्यामुळे चव्हाण यांच्या विरोधात प्रबळ उमेदवार देण्यासाठी त्यांनी दिंडोरीचे शिवसेनेचे माजी आमदार धनंजय महाले यांना आपल्या गळाला लावले आहे. त्यामुळे मागील निवडणूकीत चव्हाण यांच्या विरोधात लढलेल्या डॉ.भारती पवार यांना पुन्हा निवडणूकीची उमेदवारी मिळणार की धनंजय महाले यांना याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर माकपाचे आमदार जीवा पांडू गावीत यांनी आदिवासी प्रश्नावर मागील वर्षी नाशिक ते मुंबई लॉंग मार्च काढल्याने त्या बळावर गावित यंदा खासदारकीची निवडणूक लढविण्यास इच्छूक असल्याचे बोलले जात असल्याने यंदाची निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता आहे.
हरिश्चंद्र चव्हाण यांची तीन टर्म मधील कामगिरी फारशी उठावदार झाली नसल्याने भाजपकडून नाशिकच्या महापौर रंजना भानसी यांच्या नावाची चर्चा होत असली तरी चव्हाणांचा संपर्क पाहता त्यांनाच भाजप पुन्हा उमेदवारी देणार का? याकडे सर्वांच लक्ष लागून आहे.
सध्य परिस्थितीला जिल्हा परिषद, मनमाड, नांदगाव, निफाड तसेच अनेक ग्रामपंचायती या शिवसेनेकडे आहेत. त्या तुलनेत भाजपची चांदवड मतदार संघ वगळता फारशी ताकद नसल्याने, सेना-भाजपा युती झाल्यास त्याचा मोठा फायदा भाजप उमेदवाराला होईल.
एकंदरीतच हरिश्चंद्र चव्हाण यांच्याबद्दल असलेल्या नाराजीचा फटका त्यांना बसणार की पुन्हा सलग चौथ्यांदा ते निवडून येणार हे लवकरच स्पष्ट होईल.
दिंडोरी लोकसभा यंदा भाजपसाठी जड जाणार? राष्ट्रवादीचेही तगडे आव्हान
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
08 Feb 2019 09:59 PM (IST)
गेल्या तीन निवडणूकांपासून दिंडोरी मतदार संघ भाजपच्या हरिश्चंद्र चव्हाण यांच्या ताब्यात राहिला आहे. परंतु यंदाची निवडणूक त्यांच्यासाठी जड जाणार असे चित्र सध्या मतदार संघात पाहायला मिळत आहे. तसेच ही जागा जिंकण्यासाठी राष्ट्रवादीकडून मोर्चेबांधणी सुरु आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -