Gunaratna Sadavarte : एसटी कामगारांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी 'एसटी कष्टकरी जनसंघ' या संघटनेची स्थापना केली असून त्यांनी याबाबत आज अधिकृत घोषणा केली.  सदावर्ते यांनी यावेळी जय श्रीराम अशा घोषणा दिल्या.   


राज्यभरात झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे गुणरत्न सदावर्ते चर्चेत आले आहेत. संघटनेची स्थापना केल्यानंतर सदावर्ते एसटी महामंडळ बँकेच्या निवडणुकीत स्वत:चं पॅनेल उभा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.   


गुणरत्न सदावर्ते जेलमधून बाहेर आल्यानंतर पुन्हा एसटी कर्मचाऱ्यांसाठी लढा उभारणार की आणखी दुसऱ्या पर्यायाचा वापर करणार याची उत्सुकता होती. आज त्यांनी नव्या संघटनेची स्थापना केल्यामुळे याचं उत्तर मिळालं आहे. 


राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवास्थानाबाहेर एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर आंदोलकांना भडकवल्याच्या आरोपाखाली सदावर्ते यांना जेलमध्ये जावं लागलं होतं. त्यानंतर राज्यभरातील विविध प्रकरणांमध्ये सदावर्ते काही दिवस जेलमध्ये होते. गुणरत्न सदावर्ते 26 एप्रिलला जेलमधून बाहेर आले. त्यानंतर ते पुन्हा जोशाने सरकारविरोधात भूमिका घेणार हे त्यांच्या वागण्यावरुन स्पष्ट झालं होतं. मात्र, ही भूमिका ते आंदोलनातून मांडणार की आपली नवी राजकीय कारकीर्द सुरु करणार हे मात्र स्पष्ट नव्हतं. गुणरत्न सदावर्ते लवकरच सक्रिय राजकारणात प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सदाववर्ते हे एसटी बँकेच्या निवडणुकीत आपलं पॅनल उभं करणार आहेत. तशी तयारी देखील त्यांनी सुरु केली आहे.


एसटी बँकेचे राज्यात तब्बल 90 हजार मतदार आहेत. सध्या या बँकेवर राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित एसटी कामगार संघटनेची सत्ता आहे. मात्र याच संघटनेच्या विरोधात सदावर्ते यांनी रणशिंग फुंकले असून आगामी निवडणुकीमध्ये त्यांचे उमेदवार नक्कीच वेगळी जादू करतील अशी शक्यता वर्तवली आहे.


गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी कामगारांच्या संपात सहभागी झाल्यानंतर कायम आपल्या निशाण्यावर शरद पवार यांनाच ठेवलं होतं. शिवाय शरद पवार यांनीच एसटी कर्मचाऱ्यांचं नुकसान केलं, जाणीवपूर्वक तेच विलिनीकरण टाळत असल्याचा गंभीर आरोप सदावर्ते यांनी केला होता.


महत्वाच्या बातम्या


Gunaratna Sadavarte : सदावर्ते यांचं लक्ष्य आता 'एसटी बँक', निवडणुकीत पॅनेल उभं करत देणार राष्ट्रवादीला शह