जळगाव : रत्नागिरीसह जळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या डेल्टा प्लस व्हेरियंटचे रुग्ण आढळून आल्याचं निदर्शनास आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या आहेत. यामध्ये येत्या 27 जूनपासून म्हणजेच उद्यापासून पुन्हा एकदा निर्बंधांमध्ये वाढ केली आहे. संध्याकाळी पाच ते सकाळी पाचपर्यंत सोमवार ते शुक्रवार वैद्यकीय कारण व्यतिरिक्त नागरिकांना मुक्त संचार करण्यास बंदी केली आहे. सोमवार ते शुक्रवार हे निर्बंध असले तरी शनिवार आणि रविवार अत्यावश्यक सेवा वगळता पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असल्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले आहेत.
डेल्टा प्लसमुळे राज्यात कुठेही निर्बंध लावणार नाही; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून स्पष्ट
अशी आहे जळगाव जिल्ह्यासाठी नियमावली!
- यामध्ये प्रामुख्याने अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकानं चार वाजेपर्यंत सुरु ठेवता येणार असली तरी पाचपेक्षा अधिक ग्राहक काऊंटरवर असता कामा नये, शिवाय दुकानाला फेस शिल्ड असणे बंधनकारक असणार आहे.
- शनिवार आणि रविवारी मात्र दुकानं पूर्णपणे बंद ठेवण्यात येतील.
- या काळात शॉपिंग मॉल, सिनेमा थिएटर हे पूर्णपणे बंद राहतील. हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार हे पन्नास टक्के ग्राहक क्षमतेने सोमवार ते शुक्रवार दुपारी चार वाजेपर्यंत सुरु ठेवता येणार असले तरी कोरोनाबाबत पाळावयाचे नियम बंधनकारक असणार आहेत.
- डायनिंग हॉलसाठी दुपारी चारनंतर केवळ पार्सल सुविधा देता येतील.
- मॉर्निग वॉक आणि सायकलिंगसाठी सकाळी पाच ते नऊ पर्यंत सवलत असणार आहे
- खासगी कार्यालय 50 टक्के क्षमतेसह दुपारी चार वाजेपर्यंत सुरु ठेवता येणार आहेत.
- लग्न समारंभासाठी केवळ 50 लोकांची उपस्थिती बंधनकारक आहे. शिवाय यासाठी दुपारी चार वाजेपर्यंतची सवलत असेल.
- अंत्यविधी साठी केवळ 20 लोकांची उपस्थिती अपेक्षित आहे.
- शाळा कॉलेज, महाविद्यालय, कोचिंग क्लासेस पूर्णपणे बंद राहणार आहेत.
- सार्वजनिक वाहतूक 100 टक्के क्षमतेसह सुरु राहणार, मात्र उभे राहून प्रवास करण्यास मनाई असेल.
- आंतरजिल्हा प्रवास सुरु राहणार असला तरी श्रेणी पाचमध्ये असलेल्या जिल्ह्यातून प्रवास करण्यासाठी पोलीस विभागाकडून ई-पास घेणे आवश्यक असणार आहे.
- जिम, सलून, ब्युटी पार्लर हे दुपारी चार वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी असली तरी त्यासाठी 50 टक्के ग्राहक हे प्री बुकिंग पद्धतीने घेता येणार आहेत. त्यात एसीचा वापर करता येणार नाही
अशा प्रकारचे विविध निर्बंध जिल्हा प्रशासनाने जारी केले असून या नियमांच उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.