रत्नागिरी : खेड-दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय कदम यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 2005 मधील तोडफोड आणि शासकीय कामात अडथळा आणण्याचे प्रकरण संजय कदमांना चांगलंच भोवलं आहे.


याप्रकरणी खेड दिवाणी न्यायालयाने आमदार कदम यांना एक वर्ष सश्रम कारावास आणि दंड अशी शिक्षा सुनावली होती. हा निर्णय अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने कायम ठेवल्याने आमदार कदमांना आज पोलिसांनी ताब्यात घेतले. कोर्टाने सुनावलेल्या शिक्षेनुसार कदम यांची जिल्हा कारागृहात रवानगी होणार आहे. आमदार कदम कोर्टाच्या या निर्णयाला हायकोर्टात आव्हान देणार आहेत.

याप्रकरणी कदम यांच्याशी बातचित केली असता, त्यांनी सांगितले की, 2005 साली खेडमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. झालेल्या नुकसानाविषयी शेतकऱ्यांनी अनेकवेळा सबंधित कार्यालयात फेऱ्या मारुनही अधिकारी लक्ष देत नव्हते. त्यामुळे शेतकरी त्यांची तक्रार घेऊन माझ्याकडे आले.

शेतकऱ्यांची व्यथा ऐकल्यानंतर मी त्यांच्या न्यायासाठी सबंधित कार्यालयात जाब विचारण्यासाठी गेलो होतो. परंतु त्यांनी माझ्याविरोधात तोडफोड आणि शासकीय कामात अडथळा आणल्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली.

कदम म्हणाले की, त्यावेळी मला एक वर्ष सश्रम कारावास आणि दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली होती. माझ्यावर शासकीय अधिकाऱ्यांनी केलेले सर्व आरोप खोटे आहेत. अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला मी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देणार आहे.