लातूर : युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला 18 जुलैपासून सुरुवात झाली. येत्या काळात आदित्य ठाकरे शिवसेनेचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरणार असल्याच्या जोरदार चर्चा आहेत. त्या पार्श्वभूमीवर हा दौरा त्यांच्यासाठी महत्त्वाचा ठरला आहे. आदित्य ठाकरे गेल्या काही काळात राजकीयदृष्ट्या सक्रीय झाले आहेत.


जन आशीर्वाद यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला काल सोलापूरहून सुरुवात झाली. आज युवायेना नेते आदित्य ठाकरे यांनी शेतीप्रश्न समजून घेत शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांसोबत त्यांनी शेतात काम करण्याचा अनुभवदेखील घेतला. लातूरमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधून निघाल्यानंतर आदित्य ठाकरे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पोहोचले. इतकंच नाही तर त्यांनी शेतकऱ्यांसोबत पेरणी करत सध्याच्या पेरणीची स्थिती आणि व्यवसायात येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या.



लातूरहून उदगीरकडे जाताना चाकूरसह उदगार तालुक्यातील नळेगाव, डिघोळ शिवारातील शेतकऱ्यांशी आणि ग्रामस्थांशी संवाद साधला. आदित्य ठाकरेंनी चाढ्यावर मूठ धरत पेरणीही केली. पावसाने दुलकावणी दिल्याने काय अडचमी निर्माण झाल्या, पिकांची सध्यस्थिती काय आहे, पाण्याचं नवियोजन कसं आहे याबाबत चर्चा केली.