Uddhav Thackeray : बारसू प्रकल्पाला (Barsu project) स्थानिकांचा विरोध आहे. त्यामुळं नागरिक जर या प्रकल्पाला विरोध करत असतील तर शिवसेना पक्षप्रमुख म्हणून मी सुद्धा या प्रकल्पाला विरोध करणार असल्याचे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले. सरकारकडून दडपशाही सुरु आहे. पर्यावरणाची हानी होणार असेल तर हा प्रकल्प नको असेही ते म्हणाले. महाराष्ट्राला राख आणि गुजरातला रांगोळी असं केलं जात आहे. माझं म्हणणं आहे की, हा प्रकल्प गुजरातला न्या आणि वेदांता प्रकल्प महाराष्ट्रात आणा असे उद्धव ठाकरे म्हणाले.
उपऱ्यांची सुपारी घेऊन स्थानिकांवर वरंवंटा कशासाठी?
चांगले प्रकल्प गुजरात आणि दिल्लीला नेले जात आहेत. विनाशकारी प्रकल्प महाराष्ट्राला दिले जात असल्याचे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. मी जर दबावाखाली असतो तर आज इकडे आलो असतो का? असा सवालही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.जनतेशी संवाद न करता तुम्ही प्रकल्प कसे लादू शकता असेही ते म्हणाले. या प्रकल्पामुळं पर्यावरणाची हानी होणार असेल तर प्रकल्प इथे नको आहे. उपऱ्यांची सुपारी घेऊन स्थानिकांवर वरंवंटा कशासाठी? असा सवालही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. उद्धव ठाकरे यांनी आज बारसू इथं भेट दिली. यावेळी त्यांनी येथील स्थानिकांशी संवादही साधला. त्यांनतर त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर आपली भूमिका मांडली.
कातळशिल्प प्रकल्पात जाऊ देणार नाही
जर इथल्या भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळणार असतील प्रकल्प हवे आहेत. पण पर्यावरणाची हानी होणार असेल तर असे प्रकल्प नकोत. आम्ही विकासाच्या आड येणार नाही, पण पर्यावरणाची हानी होणार असेल तर आम्ही विरोध करणार असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी आज रिफायनरी प्रकल्प विरोधकांची सोलगाव इथे भेट घेतली. त्यानंतर बारसू कातळशिल्पची पाहणीही त्यांनी केली. गिरमादेवी कोंड येथे येथील ग्रामस्थांशी त्यांनी संवाद साधला. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. विनाशकारी प्रकल्प येऊ नये यासाठी कोकणवासियांची भेट घेण्यासाठी आलो असल्याचे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. समर्थकांसोबत आमचा संपर्क झाला नाही, असं खासदार विनायक राऊत यांनी सांगितलं. तसंच सत्ताधाऱ्यांना सत्तेत असताना नौटंकी करण्याची गरज काय त्यापेक्षा हिम्मत असेल तर त्यांनी विरोध करणाऱ्यांना भेटावं, असं आव्हान देखील त्यांनी यावेळी दिले. सोलगावजवळच्या कातळशिल्पाची आज उद्धव ठाकरेंनी पाहणी केली. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, कातळशिल्प प्रकल्पात जाऊ देणार नाही. संवर्धनासाठी मी युनस्कोला पत्र लिहलं होत असेही उद्धव ठाकरे म्हणाले.