मुंबई : 'सैराट' चित्रपटातला 'आर्ची'चा 'बाप' तुम्हाला नक्कीच आठवत असेल... 'आप्पा पाटील'... गावचा सरपंच, तालुक्यातील राजकारणातलं मोठं नाव असलेल्या 'आप्पा'ला राजकारणातली पुढची शिडी चढत 'आमदार' व्हायचे होते. याच चित्रपटातला 'परशा'चा 'बाप'ही तुम्हाला आठवत असेलच. बनियानवरचा मासेमारी करणारा गरीब माणूस... 'आर्ची'च्या बापाच्या 'श्रीमंती' अन 'पदा'ची बरोबरी करू शकत नसल्यानं पोरगा परश्या'च्या प्रेमाला त्याच्याबद्दलच्या काळजीनं विरोध करणारा 'बाप' या चित्रपटात तुम्ही पाहिला असेलच. मात्र, या चित्रपटानं सर्वांचेच दिवस अगदी पालटले होते. 


चित्रपटाचे दिग्दर्शक असलेल्या नागराज मंजुळेंपासून तर चित्रपटातील रिंकू राजगुरू अन आकाश ठोसर या 'आर्ची-परश्या'चे दिवस या चित्रपटाने पुर्णपणे पालटविले आहेत. 'सैराट'मधील 'रिल लाईफ'मध्ये 'आर्ची'च्या बापाची बरोबरी 'परश्या'चा गरीब बाप करू शकला नव्हता. आता 'रियल लाईफ'मध्ये मात्र 'परश्या'चा बाप 'रिल लाईफ'मधल्या 'आर्ची'च्या बापाची बरोबरी करायला निघाला आहे. ही बरोबरी करण्याचा प्रयत्न आहे राजकारणातला. 'सैराट'मधला 'परश्या'चा बाप आता 'राष्ट्रवादी काँग्रेस'चा नेता म्हणून ओळखला जाणार आहे. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट आघाडीत मराठवाडा विभागाचं उपाध्यक्षपद मिळालं आहे. 


 'सैराट' चित्रपटात 'परश्या'च्या वडिलांची भूमिका केलेले जेष्ठ चित्रपट आणि नाट्य अभिनेते संभाजी तांगडे आता राष्ट्रवादीच्या चित्रपट आघाडीत सक्रिय होणार आहेत. त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चित्रपट आघाडीच्या मराठवाडा विभागाच्या उपाध्यक्षपदी नेमणूक केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट आणि सांस्कृतिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी 'एबीपी माझा'ला दिली. येत्या 29 जुलैला मुंबईत पक्ष कार्यालयात होणाऱ्या एका कार्यक्रमात तांगडे यांना सन्मानपूर्वक नियुक्तीपत्रक दिले जाणार आहे. अलिकडच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट आघाडीत मराठी-हिंदी चित्रपट क्षोत्रातील अनेक दिग्गज अभिनेते-अभिनेत्री, गायक-गायिका प्रवेश करीत आहेत. संभाजी तांगडे गेल्या अडीच दशकांपासून रंगभूमीसह चित्रपट क्षेत्रात कार्यरत आहेत. 



कोण आहेत संभाजी तांगडे? : 


संभाजी तांगडेंच गाव हे मराठवाड्यातील जालना आहे. मराठी नाट्यक्षेत्रातील चतुरस्त्र अभिनेत्यांमध्ये त्यांचं नाव घेतलं जात. आपल्या वाट्याला आलेल्या प्रत्येक छोट्या-मोठ्या भूमिकांचे "सोनं' करणारा कलाकार अशी त्यांची ओळख आहे. 46 वर्षीय तांगडे यांनी अलिकडे एका हिंदी 'वेब सिरीज'मध्येही काम केलं आहे. तांगडे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारांशी आधीपासूनच जुळले होते. त्यातूनच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट आघाडीत सक्रियपणे काम करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. चित्रपट क्षेत्रातील विविध आघाड्यांवर काम करू पाहणाऱ्या मराठवाड्यातील नवोदितांना ताकद देण्याचं काम या माध्यमातून करणार असल्याचं त्यांनी या जबाबदारी मागची भावना स्पष्ट करतांना सांगितलं आहे. 


संभाजी तांगडे यांची नाट्य आणि चित्रपट कारकीर्द : 


नाटक (अभिनय) : 
1) 'आकडा' (एकांकिका) : 250 प्रयोग
2) 'हितशत्रू' (दोनअंकी नाटक)
3) 'दलपतसिंग येती गावा' (तीन अंकी नाटक) 
4) 'शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला' : 787 प्रयोग


दिग्दर्शन : 
1) 'आकडा' (एकांकिका),
2) 'हितशत्रू' (दोन अंकी नाटक) 


सहायक दिग्दर्शक :
1) 'दलपतसिंग येती गावा' (दिगदर्शक : अतुल पेठे)
2) 'शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला' (दिगदर्शक : नंदू माधव)


चित्रपट अभिनय : 
1) 'दुसरी गोष्ट' (दिगदर्शक चंद्रकांत कुलकर्णी)
2) 'सैराट' (नागराज मंजुळे)
3) 'सायकल' (सुरज मौर्या)


आगामी चित्रपट : 
1) 'तेंडल्या' ( राज्य शासनाचे पाच पुरस्कार प्राप्त 2018)
2) 'चिवटी' (दिग्दर्शक : राजकुमार तांगडे)
3) 'क्षितीज' (मनोज कदम)


वेब सिरीज : 
1) 'गिल्टी माईंड' (आगामी हिंदी वेबसिरीज)


पुरस्कार : 
1) सहायक अभिनेता (2013-14 'मीफ्ता सन्मान', 'शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला')
2) झी गौरव 2013 ( सहायक अभिनेता, 'शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला')


29 जुलैला घेणार पदाची सूत्रं : 


     येत्या 29 जुलैला मुंबईत पक्ष कार्यालयात होणाऱ्या एका कार्यक्रमात तांगडे यांना सन्मानपूर्वक नियुक्तीपत्रक दिले जाणार आहे. यावेळी राज्याच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि मंत्री उपस्थित राहणार असल्याची माहिती चित्रपट आघाडीचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी दिली आहे. याच कार्यक्रमात मराठी चित्रपटसृष्टीतील काही नामवंत अभिनेते राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट आघाडीत प्रवेश करणार असल्याची माहितीही त्यांनी 'एबीपी माझा'ला दिली.