Majha Katta : "द कश्मिर फाईल्स या चित्रपटातून काश्मीरी पंडितांच्या वेदना मांडण्यात आल्या आहेत. माझ्यासारख्या अनेकांची ही कथा आहे. परंतु, ज्युरी नदाव लॅपिड (Nadav Lapid) यांच्या टीकेनंतर त्यांना कानाखाली मारण्याची इच्छा झाली होती, असे उत्तर ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) यांनी एबीपी माझाच्या माझा कट्ट्यावर दिलं.   


काश्मीरी पंडितींची वेदना मांडणारा द कश्मिर फाईल्स हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून नव्या वादाला तोंड फुटलं आहे. यावर अनेकांनी टीका केलीय. गोव्यात नुकत्यात पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्वात ज्युरी नदाव लॅपिड (Nadav Lapid) यांनी या चित्रपटाचा 'वल्गर' आणि 'प्रोपगंडा' असा उल्लेख केला. त्यानंतर हा वाद आणखीनच उफाळला. याच पार्श्वभूमीवर अनुपम खेर यांनी माझ्या कट्ट्यावर या चित्रपटाबाबतच्या अनेक गोष्टी उलगडल्या.   


अनेक काश्मीरी पंडितांची त्यावेळी हत्या करण्यात आली. महिलांवर अत्याचार करण्यात आले. याबाबतची त्यांना माहिती देखील आहे. परंतु, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या व्यासपीठावरून जर लॅपिड असे वक्तव्य करत असतील तर मला वाटतं ते योग्य नाही. कारण ते तेथे एक पाहुणे म्हणून आले होते. त्यांना आदराने तेथे बोलवण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी अशा गोष्टींवर बोलणं योग्य नव्हतं. गेस्ट रूममध्ये चित्रपटांवर चर्चा करून कोणत्या चित्रपटाला कोणता पुरस्कार देता येईल हे ज्युरीचं काम असतं. परंतु, त्यांनी तेथे वादग्रस्त व्यक्तव्य केलं. लॅपिड यांच्या वक्तव्याने निम्या भारतातील लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, अशी नाराजी अनुपम खेर यांनी यावेळी व्यक्त केली.  


काश्मीरी पंडितांवरील हल्ल्यानंतर महाराष्ट्रात फक्त बाळासाहेब ठाकरे यांनी पीडितांना आश्रय दिला. त्यांनी मुलांना शाळेत प्रवेश देण्याच्या सूचना दिल्या आणि लोकांना राहण्यासाठी जागा दिली, अशी आठवण अनुपम खेर यांनी यावेळी सांगितली. याबरोबरच काश्मीरमध्ये नरसंहार झालाच नाही असं म्हणणं त्रासदायक आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.  


अनुपम खेर यांनी यावेळी त्यांच्या करियरच्या सुरूवातीला आलेल्या अडचणींबाबतही सांगतिले.  "3 जून 1981 रोजी नोकरीच्या शोधात मुंबईत आलो. त्यापूर्वी लखनऊमध्ये ड्रामा स्कूलमध्ये शिक्षक होतो. त्यावेळी मी 23 ते 24 वर्षाचा असेन. तीन महिन्यांसाठी ही नोकरी होती. मुंबई एका ड्रामा स्कूलमध्ये शिक्षकाच्या नोकरीसंदर्भात एक जाहीरात आली होती. यामध्ये पाच हजार रूपये पगार आणि राहण्यासाठी एक घर देण्यात येणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे मी अर्ज केला. अर्ज केल्यानंतर मला व्हिटी स्टेशनवर घेण्यासाठी येणार म्हणून सांगितले. परंतु, मी तेथे आल्यानंतर कोणीच आलं नाही. थोडी माहिती काढल्यानंतर ते ड्रामा स्कूल फेक असल्याचे समजले. त्यानंतर मी मित्राकडे राहायला गेलो. परंतु, दहाच दिवस त्याच्याकडे राहिलो. त्यानंतर वांद्रा येथे मी राहू लागलो. मुंबईत प्लॅटफॉर्मवर देखील काही वेळा दिवस काढावे लागले, अशी आठवण अनुपम खेर यांनी यावेळी सांगितली. 


अनुपम खेर यांनी अनेक वेळा एखादी घटना घडल्यानंतर त्यावर आपले मत व्यक्त केले आहे. त्यावरून देखील त्यांना त्रास झाल्याचे ते सांगतात. "मत मांडणं माझा अधिकार आहे. परंतु, भूमिका मांडल्याने अनेकांनी चित्रपट नाकारले, अशी खंत अनुपम खेर यांनी यावेळी बोलून दाखवली.