मुंबई : शिवसेनेच्या (Shiv Sena) बंडखोर आमदारांच्या अपात्रतेबाबत सुप्रीम कोर्टात 20 जुलै रोजी सुनावणी होणार आहे. आमदारांकडून पक्षाच्या आदेशाचं उल्लंघन झालं असल्याचं स्पष्ट दिसत आहे. त्यांच्यावर कडक कारवाई व्हायला हवी. त्यामुळे मला खात्री आहे की, बंडखोरी केलेल्या आमदारांची आमदारकी रद्द होईल, असाच निर्णय कोर्टाकडून येईल, असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी व्यक्त केला.
शिंदे गटातील बंडखोर आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यासाठी शिवसेनेकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर 11 जुलै रोजी सुनावणी झाली. परंतु, कोर्टाने खंडपीठ स्थापन केल्यानंतर सुनावणी घेण्यास परवानगी दिली होती. त्यामुळे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय खंडपीठ स्थापन झाले आहे. हे खंडपीठात बुधवारी याचिकेवर सुनावणी होणार आहे. तर सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा हे 26 ऑगस्ट रोजी निवृत्त होणार आहेत.
जयत पाटील म्हणाले, " बंडखोरी केलेल्या आमदारांकडून पक्षाच्या आदेशाचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. शिवाय सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा हे 26 ऑगस्ट रोजी निवृत्त होणार आहेत. त्यामुळे मला खत्री आहे की, निवृत्ती पूर्वी ते चांगला निर्णय देतील.
वीज दरवाढीवरून जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. " वीजेचे दर 20 टक्क्यांनी वाढले आहेत. ही दर वाढ सामान्य माणसाला परवडणारी नाही. एकीकडे पेट्रोल डिझेलवर दिलासा दिला आणि दुसरीकडे वीज दरवाढ केली आहे, अशी टीका जयंत पाटील यांनी यावेळी केली.
जयंत पाटील म्हणाले, " आंम्ही मंजूर केलेल्या कामाला दिलेली स्थगिती उठवावी अशी सरकारकडे मागणी केली आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांना भेटून तातडीने मदतकार्य सुरू करावं अशी विनंती केली आहे. शिवाय शेतकऱ्यांना तातडीने एक लाख रूपयांची नुकसान भरपाई द्यावी अशी देखील मागणी केली आहे. याबरोबरच आज एसटी अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना दहा लाख रूपयांची मदत द्यावी अशी देखील मागणी केली आहे.
लक्ष्मण मानेंचा पुन्हा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश
"उपराकार लक्ष्मण माने पुन्हा एकदा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत आहेत. त्यांनी मागच्या काही वर्षात अनेक लोकांना जोडलं आहे. आज या सर्वांना घेऊन पक्षात प्रवेश करत आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कायम वंचित घटकाला मदत केली आहे. ते काय नाहीं रे वर्गाच्या पाठीशी उभे राहिले. अजूनही समाजात मोठा वर्ग आहे जो मदतीपासून वंचित आहे. त्यांच्यासाठी आता लक्ष्मण माने काम करतील. मागच्या सरकारच्या काळात दोन खाती आपल्याकडे मागून घेतली होती. त्यामधे सामाजिक न्याय खातं आणि अल्पसांख्याक खातं यांचा समावेश होता. त्यातून अनेकांना मदत करण्याचं काम आम्ही केलं, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली.
जयंत पाटील म्हणाले,"लक्ष्मण माने यांनी भटक्या विमुक्त जातींसाठी चांगलं काम केलं आहे. समाजाला सक्षम करण्याचं आणि नव्या पिढीला दिशा देण्याचं, आधार देण्याचं काम मागील 30 ते 40 वर्ष ते करत आहेत. शरद पवार यांनी नेहमीच अशा व्यक्तींनी न्याय दिलाय. महाविकास आघाडी सरकारमध्ये शरद पवार यांच्या आग्रहाखातर अल्प संख्याक आणि सामाजिक न्याय ही दोन खाती मागूण घेतली होती. ही खाती मिळाली तर शोषित वर्गाला न्याय देता येईल असं त्यांचं मत होतं."