माळशिरस (सोलापूर) : जमिनीच्या वादातून एका महिलेस पेटवल्याची घटना माळशिरस तालुक्यातील कारुंडे येथे घडली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने या महिलेस अकलूज येथील रुग्णालयात दाखल केले असून या महिलेची प्रकृती आता स्थिर आहे.
माळशिरस तालुक्यातील टोकाला असलेल्या कारुंडे या गावातील कारे वस्ती येथे लोखंडे कुटुंबाची एकत्रित साडेतीन एकर जमीन आहे. यातील काही जमीन लोखंडे यांनी पिंटू जगताप याना विकली होती. मात्र नंतर वाटण्या झाल्यावर या जमिनीबाबत माळशिरस न्यायालयात दिवाणी केस सुरु होती. काल जमीन खरेदी केलेले पिंटू जगताप काही लोकांच्यासह येथे येऊन त्यांनी खरेदी केलेल्या जमिनीत नांगरणी सुरु केली. यास लोखंडे कुटुंबातील महिलांनी यास विरोध करताच त्यांना मारहाण करून आशा शिवाजी लोखंडे यांच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिल्याची फिर्याद नातेपुते पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
या प्रकारानंतर पोलिसांनी तातडीने फिर्यादीत असलेल्या 8 आरोपींना ताब्यात घेतले असून यात जगताप गटातील 4 महिला आणि 4 पुरुषांचा समावेश आहे. दरम्यान या प्रकरणावर दोन्ही गटाकडून कोणीच बोलण्यास तयार नसून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.