लातूर : जिल्ह्यातील देवकरा गावाच्या शिवारात रात्री विचित्र घटना घडली आहे. या गावातील प्रभाकर मुरकुटे यांच्या शेतात विहीर खोदण्याचे काम सुरु होते. यासाठी पोकलेनची मदत घेण्यात येत होती. पोकलेनच्या मदतीने काम जलद गतीने करावे असा त्यांचा विचार होता. यासाठी देवकरा गावाच्याच बाजूच्या कोळवाडी गावातील दहिफळे यांनी मध्यस्ती करत पोकलेन भाड्याने मिळवून दिला होता. रात्री साडे आठ वाजता शेतात विहीर खोदण्याचं काम सुरु असतानाच अपघात झाला. पोकलेनचा भीषण स्फोट झाला. त्याचे सर्व लोखंडी सामान आणि त्याचे स्पेयर पार्ट हवेत उडाले.
 
पोकलेनचे उडालेले भाग बाजूलाच उभे असलेले प्रभाकर मुरकूटे आणि दहिफळे यांच्या अंगावर पडले. या अपघातात या दोघांचा जागीच मृत्यू झाला. पोकलेनला भीषण आग लागली होती. मोठा आवाज ऐकून लोक घटनास्थळी धावले. घटनेची माहिती किणगाव पोलीस ठाण्यास मिळताच तत्काळ अहमदपूर येथून अग्निशमन दलाच्या गाडीस पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाने अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. 



पोकलेनमध्ये डिझेल असल्यामुळे आग धुमसतीच होती. त्यामुळे आग उशिरा आटोक्यात आली. पोकलेन चालक गंभीर जखमी असून त्याच्यावर प्रथमोपचार केल्यानंतर त्याला लातूरमधील अंबाजोगाई येथील दवाखान्यात पाठविण्यात आले आहे. विजेच्या तारेला पोकलेनचा स्पर्श झाल्यामुळे स्फोट झाला असल्याचं बोललं जात आहे. मात्र घटना नेमकी कशी घडली याचा तपास सुरु आहे. आम्ही माहिती घेत आहोत. या घटनेतील तीन व्यक्तींपैकी दोन जणांचा जीव गेला आहे, तर एकजण गंभीर जखमी आहे. आताच घटना कशी घडली हे सांगता येणार नाही. चौकशी सुरु आहे, अशी माहिती किणगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी शैलेश बंकवाड यांनी दिली आहे.
       
दरम्यान, ही घटना नेमकी कशामुळे घडली पोकलेनसारख्या वाहनाचे पार्ट हवेत उडून कसे गेले? याबाबत सध्या अनेक तर्क लावले जात आहेत. याचे चित्र पोलीस तपासानंतरच स्पष्ट होईल. दोन्ही मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविण्याची प्रक्रिया रात्री उशिरा पर्यंत सुरु होती. आवाज मोठा आल्यामुळे आजूबाजूच्या गावातील लोक मोठ्यासंख्येने घटनास्थळी जमले होते. अचानक घडलेल्या या विचित्र अन् भीषण अपघातामुळे गावातील नागरिकांमध्ये भितीचं वातावरण पसरलं आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :