रायगड: मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर सोमवारी (21 ऑगस्ट) सकाळी झालेल्या अपघातात रायगडमधील खोपोली (Khopoli) पोलिसांनी कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या लेनवर सकाळी कंटेनर उलटला, या अपघातात चार ते पाच वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत.


कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल


सकाळी 9 च्या सुमाराला ही घटना घडली. सकाळच्या सुमारास अपघात घडल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली होती. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. यानंतर खोपोली पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 304 अ (निष्काळजीपणामुळे मृत्यू), 279 (रॅश ड्रायव्हिंग), 337 आणि 338 आणि मोटार वाहन कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. कंटेनर चालक पद्मनाभम सुरेश त्रिवेदी (वय 34) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तो अपघातात जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.


जखमी आणि मृतांच्या नावाची यादी


खोपोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी 9 वाजता मुंबई -पुणे एक्स्प्रेस हायवेवर हा अपघात झाला असून यामध्ये बकुल मनोहर राऊत (वय 46) आणि तेजस्विनी बकुल राऊत (वय 45) अशा दोघांचा मृत्यू झाला असून, दोघेही मुंबईच्या विलेपार्ले येथील रहिवासी होते. तर आरती अजित गडदे  (वय 65), अस्मिता खटावकर (वय 40), आशिष लोकरे (वय 45), अंजना लोकरे (वय 73) आणि योगेश जाधव (वय 30) आणि कंटेनर चालक अशी पाच जखमींची नावं आहेत.


कंटेनरची चार कारला धडक, दोघांचा मृत्यू


पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातातील कंटेनर टेलर नंबर MH 46 AR 0181 हा असून चालक त्याचा ताब्यातील कंटेनर टेलर हा पुण्यावरुन मुंबईकडे चालवत घेवून जात असताना अपघात घडला. वळणाच्या आणि उताराच्या रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून अतिवेगाने आणि हयगयीने गाडी चालवल्याने हा अपघात झाला. टेलरवरील नियंत्रण सुटून पुढे चालणाऱ्या टाटा पंच कारला (नंबर MH 12 VC 8987) पाठीमागून ठोकर मारली, रस्त्यावरील दुभाजक तोडून त्यासहित पुणे लेनवर येवून अजून तीन गाड्यांना टेलरने धडक दिली.


स्विफ्ट कार (MH 48 A 6512), डस्टर गो कार (MH 04 JB 9653) आणि इको स्पोर्ट कारला (MH 47 AU 7751) कंटेनरने धडक दिली. या धडकेत स्विफ्ट कार कंटेनरखाली आली आणि त्यावरील चालक बकुल मनोहर राऊत (वय 46) आणि तेजस्वीनी बकुल राऊत (वय 45) यांचा मृत्यू झाला. इतर दोन कारमधील 3 महिला आणि 2 पुरूष यांना दुखापत झाली आहे, त्या संबंधित गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.


कंटेनर चालकावर देखील उपचार सुरू


सर्व मृत आणि जखमींना कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. जखमींवर अद्याप उपचार सुरू आहेत. तर मृतांची शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला जाईल. मात्र खोपोली पोलिसांनी कंटेनर चालकावर गुन्हा दाखल केला असला तरी तो जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत, त्याची सुटका झाल्यानंतर त्याला अटक केली जाईल.


हेही वाचा:


Ratnagiri News : दापोली पाठोपाठ गुहागर बोऱ्या समुद्रकिनारी सापडला अंमली पदार्थाचा साठा; 20 किलो चरस आढळल्याने खळबळ