नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाला शिकणारे अनेक विद्यार्थी एम लॉ या विषयात अनुत्तीर्ण झाले झाले आहेत. विद्यापीठाच्या पेपर तपासणीमध्ये घोळ झाल्याचा आरोप करत आज (मंगळवारी) अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून (एबीव्हीपी) नाशिकमधील पुणे विद्यापीठाच्या उपकेंद्रात दुपारी 12 वाजता आंदोलन करण्यात येत होते. परंतु त्याच वेळी राष्ट्रवादी विद्यर्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी तिथे जाऊन गोंधळ घातला. दरम्यान एबीव्हीपी आणि एनसीपीच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना धक्काबुक्कीदेखील केली.

एबीव्हीपी आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोठा गोंधळ सुरु केला होता. परंतु सरकारवाडा पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करुन दोन्ही संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी हस्तक्षेप केला नसता तर मोठी हाणामारी झाली असती, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

दरम्यान यांचेच (भाजपचे) सरकार असूनही आंदोलनाचे नाटक कशाला? असा सवाल राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, एबीव्हीपी आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमधील भांडणात विद्यार्थ्यांचा प्रश्न बाजूला राहिला आहे. दरम्यान अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने या आंदोलनासाठी परवानगीच घेतली नसल्याचे समोर आले आहे.