मुंबई: गतसालच्या तुलनेत या वर्षी राज्यामध्ये टॅंकरची संख्या कमी लागली आहे, सर्व गावांमध्ये पाणी पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे, त्यामुळे येत्या दोन वर्षांमध्ये राज्यातील एकही गाव पाण्याविना राहणार नाही असा विश्वास राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला आहे. ते एबीपी माझाच्या प्रश्न महाराष्ट्राचे या कार्यक्रमात बोलत होते. 


हसन मुश्रीफ म्हणाले की, संपूर्ण जगाची तुलना करता भारतात उष्णतेची लाट ही तुलनेने मोठी आहे. केंद्र सरकारच्या मदतीने राज्य सरकार जल जीवन मिशन योजना राबवत आहे. पाण्याचे स्त्रोत ज्या ठिकाणी आटले आहेत त्याच ठिकाणी पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. धरणातही पाणी मुबलक राहिलं आहे. त्यामुळे या वर्षी टँकरचे प्रमाण कमी लागले आहे. येत्या दोन वर्षामध्ये एकही गाव पाण्याविना राहणार नाही


येत्या दोन महिन्यात भरतीची प्रक्रिया सुरू करणार
2017 पासून ग्रामविकास खात्यामध्ये कोणतीही भरती झाली नाही या विषयावर बोलताना हसन मुश्रीफ म्हणाले की, जिल्हा परिषदेमध्ये सर्व सवर्गांमध्ये दोन लाख पदे रिक्त आहेत. येत्या दोन महिन्यांमध्ये आम्ही ती भरती करण्यासंबंधी प्रक्रिया पूर्ण करु.


शिक्षकांच्या भरत्यांचे सामान्यीकरण होणार
ग्रामीण भागात आणि आदिवासी, रिमोट एरियामध्ये काम करण्यास शिक्षक तयार होत नाहीत. मग या क्षेत्रातल्या मुलांच्या शिक्षणाचे काय? त्यासाठी आम्ही शिक्षक भरत्यांचे सामान्यीकरण करणार असून, ऑनलाईन पद्धतीने शिक्षक भरती करण्यात येणार आहे असं हसन मुश्रीफ म्हणाले.


राज्यांतील गावांचा विकास झाला
ग्रामीण विकासामध्ये 28 हजार ग्रामपंचायची आहेत. दरवर्षी आपण यासाठी 28 हजार कोटींचा निधी देतो. त्यासाठी 50 टक्के निधी पाणी, घनकचरा अशा गोष्टींसाठी आणि 50 टक्के निधी हा रस्ते आणि इतर मूलभूत गोष्टींसाठी वापरायचा आहे. पण आता गावं चांगली होतायत. गावांचा विकास मोठ्या प्रमाणात होत असल्याचं हसन मुश्रीफ म्हणाले. 


राज्यातील महिला सुरक्षित आहेत
राज्यांतील प्राथमिक आरोग्य केंद्रांचा विकास झाला असून त्यांच्या माध्यमातून चांगल्या सोई ग्रामीण महिलांना देण्यात येत आहेत. 15 व्या वित्त आयोगाचा निधी हा प्राथमिक शाळा आणि नंतर उपकेंद्र आरोग्य आणि प्राथमिक आरोग्य केंद्रावर खर्च करण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे येत्या काळात ग्रामीण महिलांचे आरोग्य सुधारेल असा विश्वास राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला आहे. महानेटच्या द्वारे ऑप्टीकल फायबरच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास केला जात आहे असंही ते म्हणाले. 


दिल्लीच्या धरतीवर राज्यांतील शाळांचा विकास करणार
दिल्लीतील शाळांच्या धरतीवर राज्यातील शाळांचा विकास केला जाणार असल्याचं ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले. दिल्लीमध्ये ज्या प्रकारे सरकारी शाळांमध्ये शिक्षण दिलं जातं, सुविधा दिल्या जातात, त्याच प्रकारच्या सुविधा या राज्यातील सरकारी शाळांमध्ये दिल्या जाणार आहेत. कोरोनाच्या काळामध्ये ग्रामीण भागातील शिक्षणामध्ये अडथळा आला होता, आता त्यासाठी सर्व ठिकाणी ऑनलाईन, डिजिटल शिक्षणाच्या सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या आधी मुलांचा कॉन्व्हेंटच्या शाळांकडे जाण्याचा कल जास्त होता, अलिकडे तो बदलत असल्याचं दिसत आहे, सरकारी शाळा चांगल्या होत आहेत, या शाळांतील पटसंख्या वाढताना दिसत आहे.