Dadaji Bhuse on Onion : सध्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आहे. सरकारला याची जाणीव असल्याचे वक्तव्य राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे (Dadaji Bhuse) यांनी केलं. कांदा उत्पादकांच्या संदर्भात मंत्रीमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी राज्य सरकार विविध उपाययोजनांसाठी प्रयत्न करणार असल्याचे भुसे यावेळी म्हणाले. 


कांदा उत्पादकांसाठी काय उपाययोजना करणार


आज कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आहे ही वस्तुस्थिती आहे. सरकारला याची जाणीव आहे. त्यामुळे यासंदर्भात काय करता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. यासाठी कांदा चाळीची निर्मिती करणे, चांगल्या वाणाचा कांदा कसा निर्माण करता येईल, जास्तीत जास्त कांदा कसा निर्यात करता येईल तसेच शेतकऱ्यांना चांगल बियाणे कसे देता येतील यासाठी प्रयत्न करणार असल्याचे दादाजी भुसे यावेळी म्हणाले.


सर्वच वाणांची उत्पादकता कशी वाढवता येईल यासाठी प्रयत्न


सोयाबीन, कापूस यासह सर्वच वाणांची उत्पादकता कशी वाढवता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. नवीन वाण काही आणू शकतो का? यासाठी सुद्धा प्रतत्न सुरु आहेत. सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या भावना रास्त आहेत. कांद्याला सध्या कमी दर मिळत आहे. उत्पादन खर्चही निघत नाही हे खरं आहे. आम्ही या संकटातून शेतकऱ्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे भुसे म्हणाले. लाँग टर्म काही याबाबत करता येईल का याचे प्रयत्न सुरु आहेत.    


राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येऊन जवळपास अडीच वर्ष पूर्ण झाली आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील हे सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक घोषणा केल्या गेल्या, सोबतच विकासकामांचे दावे देखील केले गेले. सरकार स्थापन झाल्यानंतर कोरोना सारख्या महाभयंकर लाटेचा सामना करावा लागला. सरकारसमोर अनेक अडचणी आल्या. केंद्राकडून राज्यावर अन्याय होत असल्याच्या भावना राज्य सरकारमधील बड्या नेत्यांनी वारंवार व्यक्त केल्या. सत्ताधारी आणि विरोधी पक्षानं एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप लावले. यासह विविध प्रश्नांवर आज दिवसभर एबीपी माझावर महाचर्चा होणार आहे. या चर्चेत कृषीमंत्री दादाजी भुसे सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी विविध प्रश्नावर त्यांची भूमिका मांडली.