धुळे : एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन रखडण्याची शक्यता यासंदर्भात आज एबीपी माझाने बातमी दाखवली होती. बातमी झळकवताच एसटी प्रशासन खडबडून जागं झालं. यासंदर्भात एसटी प्रशासनानं आजच एक परिपत्रक जारी केलं आहे. एसटीच्या चालक, वाहक, यांत्रिकी कार्यशाळा कर्मचारी, स्वछता कर्मचारी यांचे शंभर टक्के वेतन 7 तारखेलाच होणार असल्यानं एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत एबीपी माझाने कायम एसटी कर्मचाऱ्यांची बाजू लावून धरत एसटी कर्मचाऱ्यांना न्याय दिला आहे, अशी भावना कर्मचाऱ्यांनी व्यक्त करत एबीपी माझाचे आभार मानले आहेत.
एसटी प्रशासनाने आज जारी केलेल्या पत्रकात नमूद केलंय की, एसटीच्या चालक, वाहक, यांत्रिकी कार्यशाळा कर्मचारी, स्वछता कर्मचारी यांचे शंभर टक्के वेतन सात तारखेलाच होणार आहे. तेही कुठलेही कपात न करता. मात्र एसटीच्या अधिकारी, लिपिक यांचे वेतन मात्र 50 ते 75 टक्केच होणार आहे.
वेतन अदा करतांना एसटीच्या चालक, वाहक, यांत्रिकी कार्यशाळा कर्मचारी, स्वछता कर्मचारी यांची 100 टक्के हजेरी म्हणजे 31 दिवस उपस्थिती ग्राह्य धरून वेतन करण्यात येणार आहे. तर पर्यवेक्षकीय कर्मचारी व लिपिक व तत्सम वर्गासाठीच्या कर्मचाऱ्यांसाठी 31 दिवसाच्या 75 टक्के म्हणजेच 24 दिवसांचे वेतन होणार आहे. तर वर्ग एक आणि वर्ग दोनच्या अधिकाऱ्यांचे 50 टक्के म्हणजे हजेरीचे 16 दिवस वेतन करण्यात यावे, असे या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. अधिकारी, लिपिक तसेच पर्यवेक्षकीय कर्मचारी यांचे वेतन दोन टप्प्यात होणार आहे.
एसटीच्या एक लाख दहा हजार कर्मचाऱ्यांमध्ये चालक, वाहकांची संख्या ही जवळपास 80 हजार आहे. चालक, वाहकांची आर्थिक पडवळ होऊ नये, यासाठी या वर्गातील कर्मचाऱ्यांचे म्हणजेच वर्ग चारमधील कर्मचाऱ्यांचे वेतन हे दोन टप्प्यात न होता एकाच टप्प्यात तेही कुठल्याही प्रकारची कपात न होता होणार असल्यानं एसटीचा मुख्य घटक असलेल्या चालक, वाहक वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे.
Central Health Ministery | 24 तासात 386 नव्या कोरोना रूग्णांची नोंद, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा : आरोग्य मंत्रालय