Majha Katta : आर्टिफिशिअल इंटेलिजन्स हे पुढे जाऊन आपल्या जीवनातील एक भाग बनेल. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गाष्टींमध्ये एआय वापरून नवीन गोष्टी आणि नवीन टूल्स तयार होणार आहे. त्यामुळे एआय खूप महत्वाचे आहे, असं पर्सिस्टंट कंपनीचे सर्वेसर्वा आनंद देशपांडे म्हणाले आहेत. एबीपी माझाचा विशेष कार्यक्रम 'माझा कट्टा'मध्ये बोलताना ते असं म्हणाले आहेत. ते म्हणाले आहेत की, ''सगळ्यांनी चॅटजीटीपी वापरून पाहिलं असेल, त्याला आपण काही प्रश्न विचारल्यास तो आपल्याला थेट उत्तर देतो. हे जे तयार झालं आहे, ते विश्वास न बसण्यासारखं आहे. भविष्यात हे आणखी किती पुढे जाईल, याबाबत सांगणं कठीण आहे.''


10 लाखात सुरु केलेली कंपनी आज  साडेअकरा हजार कोटींची झाली 


आनंदी देशपांडे आज हे खूप मोठं नाव आहे. आपल्या देशात जन्म होऊन जगभरात विस्तारलेल्या विप्रो, इन्फोसिस, टी सी एस या आयटी कंपन्यां प्रमाणे गेल्या काही दशकांत पर्सिस्टंटनेही मोठं नाव कमावलंय. जेव्हा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हा विषयच आपल्या देशासाठी नवखा होता, तेव्हा आनंद देशपांडेंनी या क्षेत्रात करिअर करुन अमेरिकेत HP सारख्या नामांकित कंपनीत नोकरी मिळवली. तिथे सगळं सुरळीत सुरु असताना 90 च्या दशकात जेव्हा देशात-जगात अस्थिर वातावरण होतं, तेव्हाच मायदेशी येत स्वतःची कंपनी सुरु करण्याचा अत्यंत धाडसी निर्णयही घेतला. केवळ 21 हजार डॉलर्सने म्हणजे आत्ताच्या सतरा- अठरा लाखांतून त्यांनी पर्सिस्टंची सुरुवात केली. गेल्या तीन दशकांत  मेहनत, सचोटी आणि सातत्याच्या जोरावर पर्सिस्टंटने 21 हजार डॉलर्सची गुंतवणूक 140 कोटी डॉलर्सवर नेलीये. म्हणजे तेव्हाच्या 10 लाखांचे आज साडेअकरा हजार कोटी झालेत. 


दीड वर्ष अमेरिकेत काम करून भारतात परतण्याचा घेतला निर्णय 


आपल्या प्रवासाबद्दल सांगताना ते म्हणाले आहेत की, ''मी 1984 मध्ये आयआयटी खडकपूरमधून कॉम्प्युटर सायन्समध्ये बीटेक केलं. त्यावेळी आमची बॅच संपूर्ण भारतातून तिसरी होती. त्यावेळी या सर्व गोष्टींची नुकतीच सुरुवात झाली होती. कॉम्प्युटर भविष्यात मोठा उद्योग  होणार, हे तेव्हाही स्पष्ट होतं. त्यानंतर मी इंडीआयनेमध्ये जाऊन कॉम्प्युटर सायन्स आणि डाटाबेसमध्ये पीएचडी केली. यानंतर मी दीड वर्ष अमेरिकेत काम केलं. तेव्हा माझ्या लक्षात होतं की, मला भारतात परत यायचं आहे.''   


देशपांडे पुढे म्हणाले की, ''1990 मध्ये मी भारतात परत आलो. तेव्हा व्ही पी सिंह भारताचे पंतप्रधान होते. एक आठवड्यनंतर रथ यात्रा झाली आणि पुढे चंद्रशेखर यांचं सरकार आलं. त्यावेळी त्यांनी पुण्यात सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क सुरु केला. त्यावेळी त्यांनी दोन गाळे म्हणजे जवळपास 8 हजार स्क्वेअर फुटात म्हणजेच 14 कंपनींना जागा देण्याचं ठरवलं. त्यावेळी त्यांनी 14 लहान लहान युनिट्स करून कंपनींना दिले. त्यात आमचा नंबर नव्हता. त्यावेळी त्यांनी सांगितलं पुढे जागा निघाल्यास आम्ही तुम्हालाही देऊ. ऑक्टोबर महिन्यात मी परत आलो, नंतर पुढे मार्च उजाडलं. पण आम्हाला जागा मिळाली नाही.'' 


ते पुढे म्हणाले, '' एन विठ्ठल यांना 10 मार्च 1991 साली पत्र लिहिलं. त्यांना मी सांगितलं आपण कॅलिफोर्नियामध्ये भेटलो होतो. तुम्ही मला सांगितलं होतं परत या, मला येऊन सहा महिने झाले आहेत. माझ्याकडे ऑर्डर आहे, कस्टमर्स आहेत, पण जागा नसल्याने मी काहीच करू शकत नाही. हे पत्र त्यांना 12 मार्चला मिळालं. संध्यकाळी त्यांचा मला फोन आला की, काय झालं. तेव्हा मी जे सुरु होतं त्याबद्दल सांगितलं. मग त्यांनी डायरेक्टर एसटीपी पुणे यांना सांगितलं की, तुम्ही दिल्लीला या, ते दिल्लीला गेले असता, 14 पैकी किती युनिट्स गेले आहे. असं त्यांना विचारलं. त्यांनी सांगितलं अद्याप कोणीही ताबा घेतलेला नाही. मग विठ्ठल यांनी डायरेक्टर एसटीपी यांना मला त्यांच्या ऑफिसची 300 स्क्वेअर फुटाचा जागा देण्यास सांगितली. यानंतर मला जागा मिळाली.''