मुंबई : मागील दोन वर्षांच्या उदंड प्रतिसादानंतर दिवाळीच्या मुहूर्तावर 'एबीपी माझा'चा (Abp Majha) तिसरा दिवाळी अंक (Diwali Ank) वाचकांच्या भेटीला आला आहे. आज या अंकाचं मुंबईत प्रकाशन झालं. एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकरांसह अनेक दिग्गज या सोहळ्याला उपस्थित होते.  मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, कवी अशोक नायगावकर, ग्रंथालीचे सुदेश हिंगलासपुरकर, अभिनेते प्रदीप वेलणकर मान्यवरांनी हजेरी लावली.  एबीपी माझाच्या दिवाळी अंकाला युनिक फीचर्स आणि ग्रंथाली प्रकाशनाचे सहकार्य लाभलं आहे. 


समाजातील सज्जनशक्तीची पाठराखण करावी आणि समाजहिताला नख लागण्याची शक्यता निर्माण होत असेल त्यावेळी पूर्ण ताकदीने त्याला विरोध करावा हे एबीपी माझाचं आजवरचं आचरण आणि ध्येयधोरण. वाचकांना माहिती देणं, त्यांचं प्रबोधन करणं, त्यांना सजग बनवणं, त्यांचं रंजन करणं, त्याचबरोबर समाजात चांगुलपणाची पेरणी करणं या भावनेतून माझाने दिवाळी अंकाच्या दुनियेत पाऊल ठेवलं. यंदाच्या दिवाळी अकांचं हे तिसरं वर्ष. 


यंदाच्या अंकात काय?


माझाच्या यंदाच्या दिवाळी अंकात काही विशेष कथांची मेजवानी वाचकांना मिळणार आहे. दिग्गज कथाकार रवींद्र शोभणे, लक्ष्मीकांत देशमुख, कृष्णात खोत, संजीव लाटकर, मोनिका गजेंद्रगडकर या लेखकांच्या कथांचा समावेश माझाच्या दिवाळी अंकात करण्यात आलाय. तसेच आपल्या कार्याने कर्तत्वान ठरलेल्यांची यशोगाथा देखील यंदाच्या दिवाळी अंकात आहे. सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात मानवी मेंदूचं विश्लेषण विवेक सांवत यांनी केलं.  महाराष्ट्राला काही वर्षांपूर्वी हादरवरुन सोडलं ते किल्लारीच्या भूकंपाने. आजही या भूकंपाच्या जखमा भळभळत्या आहेत. या भूकंपाविषयी अतुल देऊळगावकर यांनी न घेतलेल्या धड्याच्या माध्यमातून चित्र रेखाटलंय. 


सध्या मराठी चित्रपटसृष्टी सध्या कोट्यावधींचा टप्पा ओलांडला आहे. मराठी चित्रपटसृष्टीच्या या कोट्यावधी प्रवासाचे वर्णन निखिल साने यांनी केलंय. आपल्याकडे कलावंतांच्या दस्तावेजीकरणाचे विशेष प्रयत्न होताना दिसत नाहीत. त्यामुळे प्रख्यात चित्रकार सुहास बहुळकर यांच्या पुढाकाराने तयार झालेल्या चित्र - शिल्प कोशाचं महत्त्व आगळं आहे. हा कोश तयार करण्याचा त्यांचा अनुभव त्यांनी त्यांच्या शब्दात मांडलाय. 


या दिवळी अंकात लेखकांच्या लेखणीतून ललित लेखांचे देखील समीरकरण जुळून आले आहे. चित्रकार चित्रांचे विषय कसे निवडतो? चित्र सुरु असताना त्याच्या मनात कोणते विचार डोकावत असतात? या प्रश्नांची उत्तर चित्रकार अन्वर हुसेन यांनी दिली आहेत. सध्याच्या तरुणाईला रिल्सचं व्यसन जडलं आहे. कुणीही अलाण्या फलाण्याने केलेले कोणतेही रिल्स सहज फेमस होतात. या फिजूल प्रकारावर अभिनेता प्रसाद खांडेकरांनी तिरकस फटकारा मारलाय. तब्येतीचा कारणं सांगून महाविद्यालयातील विद्यार्थी अभ्यास करणं टाळाताना आपल्याला पाहायला मिळतं. करोनाच्या काळात तर डिजिटल बाहण्यांची भर पडलीये. याचंच वर्णन प्राध्यापिका वृंदा भागवत यांनी अगदी खुसखुशीत केलंय. दरम्यान सचिन मोटे यांच्या ललित लेखाने देखील एक वेगळीच गंमत निर्माण केलीये. 


माझाच्या तिसऱ्या दिवशी अंकात खाद्यसंस्कृतीचे देखील दर्शन होणार आहे. त्याचप्रमाणे नामवंत कवी आणि कवयित्रींच्या कवितांची किमया या दिवळी अंकात आहे.  नामवंत साहित्यिकांच्या लेखणीतून साकारलेला एबीपी माझाचा तिसरा दिवाळी अंक हा सर्वत्र उपलब्ध आहे.