पुणे : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) पुन्हा एकदा भर पावसात मैदानात उतरलेले दिसले. पुण्यात बावधन परिसरात सारंजाम वाटपाच्या कार्यक्रमात त्यांनी उपस्थिती दर्शवली होती. यावेळी पुण्यात मुसळधार पाऊस सुरु होता. मात्र मुसळधार पावसातही शरद पवार आपली लेक सुप्रिया सुळेंना सोबत घेत या कार्यक्रमात उपस्थित होते. दिवाळी निमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नागरिकांनी या कार्यक्रमात प्रचंड प्रमाणात गर्दी दिसून आली. पावसामुळे शरद पवार या कार्यक्रमात गैरहजर राहू शकले असते मात्र त्यांनी या कार्यक्रमात हजेरी लावली. अख्या महाराष्ट्राला त्यांच्या लढाऊ वृत्ती माहिती आहे. त्यांच्या याच लढाऊ वृत्तीचं पुण्यात पुन्हा एकदा दर्शन झालं. 


बावधनमधील कार्यक्रमादरम्यान मुसळधार पाऊस पडत होता. सगळे नागरिक आणि कार्यकर्ते भर पावसात शरद पवारांची वाट बघत थांबले होते. भर पावसात शरद पवारांची गाडी येताच अनेकांनी मोठ्याने घोषणाबाजी सुरु केली. सोबतच त्यांच्यावर फुल्लांचा वर्षाव करण्यात आला. लेक सुप्रिया सुळेंचा हात धरुन शरद पवारांनी मंच गाठला. सुप्रिया सुळेदेखील वडिलांसाठी तत्पर असल्याचं मंचावर पाहायला मिळालं. प्रातिनिधीक स्वरुपात सांरजाम वाटप करण्यात आलं. 


शरद पवारांसाठी लेक तत्पर...


शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचं नातं अख्या महाराष्ट्राला माहिती आहे. अनेक कार्यक्रमातील सुप्रिया सुळेंचे आणि शरद पवारांचं नातं अधोरेखित करणारे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. कधी वडिलांना चप्पल घालताना मदत असते. तर कधी राजकारणात वडिलांसोबतच खांद्याला खांदा लावून काम करणं असेल सुप्रिया सुळे अनेकदा गुड डॉटर ठरल्या. काहीही झालं तरी बापाशी पंगा नाही किंवा बापाचा नाद करायचा नाय, असं सुप्रिया सुळे विरोधकांना कायम खडसावून सांगत असतात. तोच प्रत्यय आत पुन्हा एकदा आला. भर पावसात वडिलांसाठी जागा करुन देत सुप्रिया सुळेंनी मंच गाठला.


आज पुण्यात पवार कुटुंब एकत्र...


राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पवारांची दिवाळी कशी होणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. अजित पवारांनी बंड केल्यानंतर शरद पवारांसोबत दिवाळी साजरी करणार का?, असाही प्रश्न राज्याला पडला होता. त्यातच आज प्रतापराव पवार यांच्या निवासस्थानी अजित पवार, शरद पवार आणि सुप्रिया सुळे या दिवाळीनिमित्त उपस्थित होत्या. या भेटी दरम्यान कोणत्याही राजकीय चर्चा झाल्या नाहीत हे सांगायला कोणीही विसरलं नाही. पवार आणि राजकारण हे समीकरण आहे. त्यामुळे यांच्या भेटीगाठी कितीही वैयक्तिक पातळीवरच्या असल्या तरीही त्याला राजकीय किनार असतेच, हे मात्र नक्की. 


इतर महत्वाची बातमी-


Sharad Pawar : प्रतापराव पवारांच्या घरी अजित पवारांची भेट, वाचा शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया