Shree Gauri Sawant On Majha Katta : आम्ही विशिष्ट पद्धतीने टाळी वाजवतो, तो आमचा आक्रोश असतो, परिस्थितीविरुद्धची चीड असते, समाजाला बलात्कारी गुन्हेगार चालतो मग आम्ही का नाही चालत असा प्रश्न श्रीगौरी सावंत यांनी विचारला आहे. समाजाला विष्णूचे मोहिनी रूप चालतं, हरिहरन म्हटलेलं चालतं, पण आम्हाला स्वीकारायचं नाही हे दुर्दैवी असल्याचं त्या म्हणाल्या. श्रीगौरी सावंत यांच्या जीवनावर आधारित ताली ही वेब सीरिज नुकतीच प्रदर्शित झाली आहे. त्यानिमित्ताने त्यांनी एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात संवाद साधला. 


प्रत्येकाची जगण्याची पद्धत वेगळी असते. अनेक तृतीयपंथीय हे आज भीक मागतात, पण मला कधीही असं वाटलं नाही, मला सन्मानानं जगायचं होतं आणि मी ते केलं असं त्या म्हणाल्या. 


टाळी वाजवणं हा आमचा आक्रोश


तृतीयपंथीय एका विशिष्ट पद्धतीने टाळी वाजवतात. त्यावर बोलताना श्रीगौरी सावंत म्हणाल्या की, टाळी वाजवणे हा आक्रोश आहे, आत असलेला राग आणि घुसमट आहे. तो परिस्थिती विरोधचा आक्रोश आहे. आम्हीही इतरांप्रमाणे माता-पित्यांच्या पोटी जन्माला आलोय. जेलमध्ये बलात्कार करणाऱ्या आरोपींनाही त्यांचे आई-वडील आणि नातेवाईक भेटायला येतात. आरोपींना तुम्ही आपलंसं करता पण मग आम्हाला का नाही स्वीकारलं जात? एक माणूस म्हणून आम्हाला का नाही स्वीकारत नाही? तृतीयपंथीय असणे हा माझा नैसर्गिक अधिकार आहे. तो समाजाने स्वीकारायला हवं. 


समलैंगिक पुरुषांना समाजात स्वीकारलं जातं, लेसबियन मुलींना स्वीकारलं जातं. पण तृतीयपंथीयांना का नाही स्वीकारलं जात? अजून किती वर्षे समाज आमच्यावर अन्याय करणार? चित्रपटात रोल करणे हे सोपं आहे, आमचं आयुष्य हे रोल नाही असं त्या म्हणाल्या.  


विष्णूचं मोहिनी रूप चालतं, हरीहरन म्हटलेलं चालतं. मग आम्ही का नाही चालत? आमचा त्रास समाजाला कुठे होतोय? असा सवाल त्यांनी विचारला. आता तृतीयपंथीय सर्व गोष्टींसाठी तयार होत आहेत, पण समाजाने स्वीकारलं जाणं गरजेचं आहे असं त्या म्हणाल्या.  


मन बाईसारखं होतं, घुसमटत होतं


मी जरी मुलगा म्हणून जन्माला आले असले तरी लहानपणापासून मला बाई व्हायचं होतं असं श्रीगौरी सावंत यांनी सांगितलं. त्या म्हणाल्या की, मुलासारखं शरीरात बदल होतं होते, पण मन मात्र बाईसारखं होतं. मनात घुसमट होत होती. माझे वडील पोलिसात होते. माझ्या भावाचे मित्र मला बाईल्या, हिजडा म्हणायचे. मग 14 व्या वर्षी मी वडिलांच्या खिशातून 60 रुपये चोरले आणि घराबाहेर पडले. माझ्यासारख्या अनेक गौरी या अशा पद्धतीने बाहेर पडल्या आहेत.