औरंगाबाद : राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा तापला असून, राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. दरम्यान, औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यात देखील असेच आंदोलन सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. तर औरंगाबादच्या फुलंब्री येथे आज रास्ता रोको आंदोलनाची हाक देण्यात आली होती. मात्र, आंदोलन संपल्यावर एका तरुणाने थेट अंगावर डिझेल घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, उपस्थित लोकांनी वेळीच हस्तक्षेप करून त्याला रोखल्याने मोठा अनर्थ टळला. वरुण पाथ्रीकर असे या तरुणाचे नाव असून, तो माजी सरपंच असल्याची माहिती समोर येत आहे. 


मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरु आहे. दरम्यान, सकल मराठा समाजाच्या वतीने फुलंब्री येथील पाल फाटा येथे औरंगाबाद ते जळगाव या राष्ट्रीय महामार्गावर भव्य रास्ता रोको आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी तब्बल चार तास शांततेत आंदोलन करण्यात आले. मात्र, रास्ता रोको आंदोलन संपल्यानंतर वरुण पाथ्रीकर या तरुणाने थेट अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. परंतु या ठिकाणी असलेले मराठा समाज बांधव आणि पोलिसांनी धाव घेत त्यांच्या हातातून डीझेलची बॉटल ओढून घेतली. तसेच या तरुणाला शांत केले. त्या नंतर त्याच्या अंगावर पाण्याचा जार ओतून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 


फुलंब्री येथे मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी बैठक घेऊन नऊ सप्टेंबर रोजी पाल फाटा येथे औरंगाबाद ते जळगाव या राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्याच अनुषंगाने पोलिसांचाही या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात पाहायला मिळाला. शनिवारी सकाळपासूनच सर्व पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मराठा समाज म्हणून मराठा क्रांती मोर्चाच्या झेंड्याखाली एकत्र झाले होते. सकाळी दहा वाजेपासून तर दुपारी दोन वाजेपर्यंत हे आंदोलन सुरु होते. 


आंदोलनात वारकरी संप्रदाय देखील हजर 


चार तासाच्या रस्ता रोको आंदोलनात समाज प्रबोधनासाठी वारकरी संप्रदाय देखील हजर होते. वारकऱ्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करीत मराठा समाजाला आरक्षण या सरकारने द्यायला हवं असे सांगितले. तसेच या ठिकाणी सात ते आठ तरुणांनी मुंडन आंदोलन केले. त्यानंतर राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. राष्ट्रगीत झाल्यानंतर पाथ्री येथील माजी सरपंच वरून पाथ्रीकर यांनी आक्रमक पद्धतीने आंदोलन करीत अंगावर डिझेल ओतून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याच ठिकाणी असलेले मराठा समाज बांधवांनी तात्काळ धाव घेतली. तसेच या ठिकाणी पोलीस बंदोबस्तात असलेले फुलंब्री पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्रीनिवास धुळे यांनी हातातील आगपेटी हिसकावून आंदोलन करते वरून पाथ्रीकर यांना शांत केले. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Manoj Jarange : सरकारचा वेळ संपला, आता उद्यापासून सलाईन काढून पाणीही बंद करणार; मनोज जरांगे आक्रमक