मुंबई : महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागाच्या भरती परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचं आता उघडकीस आलं आहे. या प्रकरणात आता राज्याच्या आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. महेश बोटले यांना अटक करण्यात आली आहे.
आरोग्य विभाग भरतीचा पेपर सेट करण्यात डॉ. महेश बोटले सहभागी होते. त्यांनीच हा पेपर फोडल्याचा पोलिसांना संशय आहे. दरम्यान, आरोग्य विभागातील भरती प्रकरणात आतापर्यंत बारा जणांना अटक करण्यात आली आहे. त्यात लातूरच्या आरोग्य विभागातील मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत बडगिरे यांचाही सहभाग आहे. या पेपरफुटी प्रकरणाचा सर्वात आधी पर्दाफाश एबीपी माझानं केला होता.
पुणे पोलिसांनी काल या प्रकरणात प्रशांत बडगिरे यांना अटक केली आहे. बडगिरेकडे केलेल्या चौकशीतून आरोग्य विभागाच्या या परिक्षेची प्रश्नपत्रिका तयार होत असतानाच ती फुटल्याचं स्पष्ट झालं आहे. ही प्रश्नपत्रिका सहसंचालक डॉ. महेश बोटले यांनी पेपर सेट करतानाच फोडली असा त्यांच्यावर आरोप आहे. महेश बोटले यांनी तो पेपर प्रशांत बडगिरे यांना दिला. त्यानंतर प्रशांत बडगीरे याने तो विकण्यास सुरुवात केली. बडगीरे याने त्याच्या विभागातील डॉ. संदीप जोगदंड याच्याकडून दहा लाख रुपये तर शाम म्हस्के या कर्मचाऱ्याकडून पाच लाख रुपये घेऊन हा पेपर विकला असा पोलिसांनी आरोप केला आहे.
हा पेपर फुटल्यानंतर राज्यभरातील अॅकॅडमी चालवणाऱ्यांकडे पोहचला. त्यानंतर अॅकॅडमी चालवणाऱ्यांकडून तो विद्यार्थ्यांना विकण्यास सुरुवात झाली. पुणे सायबर पोलीसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून या प्रकरणात सहभागी असणाऱ्या मोठ्या अधिकाऱ्यांसह इतर संशयीतांनाही तातडीने अटक केली.
आतापर्यंत या प्रकरणात 11 जणांना अटक करण्यात आली असून आणखी बडे मासे गळाला लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. आरोग्य विभागाचा हा पेपर फुटल्यानंतर तो राज्यातील अनेक ठिकाणी विकण्यात आला होता. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. त्यामुळे राज्याच्या इतरही भागातून आणखी काही जणांना या प्रकरणात अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, ए. बी. पी. माझाने पेपर फुटीचा हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर पुणे पोलीसांच्या तपासाला वेग आला आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
संबंधित बातम्या