Shiv Sena MP Sanjay Raut : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बुधवारी सायंकाळी काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांची भेट घेतली. राऊत यांनी मंगळवारी राहुल गांधीची भेट घेतली होती. त्यानंतर आज सायंकाळी प्रियंका गांधींची भेट घेतली. प्रियांका गांधी सध्या उत्तर प्रदेश निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेष लक्ष घालतायत. अशात गोवा आणि उत्तर प्रदेश निवडणुकीत उतरण्यावर शिवसेना आग्रही असताना ही भेट झाली. या भेटीनंतर संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांसोबत संवाद साधला. ते म्हणाले की, 'प्रिंयका गांधी यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली. उत्तर प्रदेश आणि गोवामधील विधानसभा निवडणूक एकत्र लढवण्याबाबत दोन्ही पक्षांमध्ये विचार सुरु आहेत. अंतिम निर्णय पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे घेतली. '
शिवसेना यूपीएमध्ये सहभागी होईल की नाही? याचा निर्णय पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील, असं खासदार संजय राऊत यांनी सांगितलं. भाजपविरोधात एकच आघाडी असावी या भूमिकेचा पुनरुच्चारही यावेळी संजय राऊत यांनी केला.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. त्यानंतर आज संध्याकाळी सोनिया गांधी यांची भेट घेतली आहे. शिवसेना यूपीएमध्ये सहभागी होणार का? या प्रश्नाचं उत्तरही राऊत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून देणार आहेत. विरोधकांची एकच आघाडी असावी अशी आग्रही भूमिका राऊत यांनी वारंवार मांडली आहे. ममता बॅनर्जींनी मुंबई भेटीत यूपीएबाबत केलेल्या वक्तव्यामुळे उलटसुलट चर्चा सुरू झाली असताना राऊत यांनी काल राहुल गांधी यांची भेट घेतली आणि पुन्हा एकदा एकाच आघाडीची भूमिका मांडली. मात्र राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याशी झालेल्या चर्चेबाबत उद्धव ठाकरे यांना माहिती देऊ आणि त्यानंतरच यूपीएत शिवसेना सहभागी होईल की नाही याबाबत भूमिका स्पष्ट करू असं राऊत यांनी म्हटलंय. त्यामुळे दोन दिवसांत शिवसेनेची याबाबतची भूमिका स्पष्ट होईल, अशी चिन्हं आहेत.