Maharashtra Pandharpur Vitthal Rukmini Mandir : पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मुर्तीला केलेला वज्रलेप अल्पावधीतच निघू लागल्यानं विठ्ठलभक्तांची चिंता वाढू लागल्याचं वास्तव ABP माझानं (ABP Majha Impcat) समोर आणलं होतं. त्यानंतर राज्य शासनानं याची गंभीर दाखल घेत तातडीची बैठक घेतली होती. त्यानुसार भारतीय पुरातत्व विभागाचे श्रीकांत मिश्रा यांच्या पथकानं आज पहाटे काकड आरतीच्या वेळी विठ्ठल आणि रुक्मिणीच्या मूर्तीची पाहणी केली. यावेळी विठ्ठल मूर्ती आणि रुक्मिणी मूर्तीवर नेमकी कोणती प्रक्रिया करावी लागेल, याचा या पथकानं अभ्यास केला. दोन्ही मूर्तींचे विविध अँगलमधील फोटो घेऊन त्यांनी प्रत्यक्ष स्पर्शानं नेमकी झीज कुठे आणि कशी होत आहे? याची पाहणी केली. यावेळी पुरातत्व विभागाचे श्रीकांत मिश्रा यांच्यासह त्यांच्या पथकामधील सदस्य सोवळे नेसून गाभाऱ्यात काम करत होते. याबाबतचा अहवालही पथक महाराष्ट्र शासन आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडे देणार आहे.
विठ्ठल रुक्मिणी मूर्ती मंदिरात सुरक्षित असेल, तरंच वारकरी संप्रदायाच्या अस्तित्वाला अर्थ असल्याची भावना विठ्ठल भक्तांत असते. म्हणून देवाच्या मूर्तीबाबत सर्वात जास्त काळजी ही लाखो विठ्ठल भक्तांना असते. मात्र अलिकडच्या काळात मूर्तीबाबत अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आता समोर येऊ लागल्यानं मंदिर समिती आणि प्रशासनाच्या कारभारात राज्य सरकारनं हस्तक्षेप करण्याची वेळ आली आहे.
विठुरायाची मूर्ती ही वालुकाशम दगडापासून बनलेली आहे. तर रुक्मिणी मातेची मूर्ती ही शाळीग्रामाच्या चकचकीत दगडाची आहे. तुलनात्मक दुर्ष्टीने पाहता विठ्ठल मूर्तीची झीज जास्त प्रमाणात होत असल्यानं आत्तापर्यंत 4 वेळा मूर्ती संवर्धनासाठी सिलिकॉन किंवा इपॉक्सी सारखे रासायनिक लेपन मूर्तीला करण्यात आले आहे. ज्या मूर्तीवर वर्षाकाठी सव्वा कोटी भाविक चरणावर स्पर्श करून दर्शन घेतात त्या मूर्तीची झीज होतंच राहणार आहे आणि यासाठी मूर्तीवर लेपन क्रिया आवश्यक आहे.
मात्र मूर्तीची झीज रोखण्यासाठी भारतीय पुरातत्व विभागानं दिलेल्या सूचनांचा कधी मंदिर समिती आणि प्रशासनानं गांभीर्यानं विचार न केल्यानं विठ्ठल रुक्मिणी मूर्तींचं अस्तित्व धोक्यात येऊ लागले आहे. ज्या-ज्या वेळी पुरातत्व विभागानं मूर्ती संवर्धनासाठी प्रक्रिया केली त्या प्रत्येक वेळी त्यांनी मंदिर समितीस मूर्तीसंवर्धनासाठी काही महत्वाच्या सूचना केल्या होत्या. ज्याचा आजपर्यंत कधीही अवलंब न झाल्यानं ही वेळ आली आहे.
विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यातील उष्णता, दमटपणा निर्माण करणारे घटक काढून टाकण्याची महत्वाची सूचना पुरातत्व विभागानं दिली होती. यामध्ये देवाच्या गाभाऱ्याचे सुशोभीकरण करण्यासाठी 22 वर्षांपूर्वी गाभाऱ्यात चकचकीत ग्रेनाईटच्या फरशा भिंतीवर लावण्यात आल्या होत्या. त्या फारशा काढून मूळ रूपातील दगडी गाभारा बनविण्याची महत्वाची सूचना आजही मंदिराच्या फाईलमध्येच पडून आहे. याशिवाय गाभाऱ्यात वापरण्यात येणारे प्रखर उष्णता निर्माण करणारे विजेचे दिवे बदलण्याच्या सूचनेचीही अंमलबजावणी केली नाही.
मूर्तीवर रासायनिक प्रक्रिया करणारे दूध, दही, साखर, मध अशा पदार्थांचा अतिशय अल्प प्रमाणात वापर करण्याची सूचना दिल्या होत्या. मात्र आजही रोजच्या नित्योपचारात मूर्तीला दुधाचे स्नान असेल किंवा साखरेचा वापर असेल हा सढळ हातानं होत आहे. श्रद्धा नक्कीच महत्वाची आहे. मात्र जेव्हा मूर्तीच्या अस्तित्वाचा प्रश्न येतो, तेव्हातरी किमान यात सूचनांचं पालन आवश्यक असतं.
अलिकडच्या काळात विविध एकादशी, धार्मिक सण यादिवशी विठ्ठल रुक्मिणी गाभारा विविध प्रकारच्या फुलांनी आणि फाळणी सजविण्याचा नवीन ट्रेंड आला आहे. ही आकर्षक सजावट अतिशय सुंदर असते. पण यामुळे पुन्हा गाभाऱ्यातील दमटपणा आणि उष्णता वाढून मूर्तीवर विपरीत परिणाम होता. याचा गांभीर्यानं विचार केला जात नाही. पुरातत्व विभागानं विठ्ठल रुक्मिणी मूर्तीच्या संवर्धनासाठी दिलेल्या सूचना पायदळी तुडविल्या जात होत्या. आता पुन्हा भारतीय पुरातत्व विभाग मूर्ती संवर्धनासाठी अहवाल शासन आणि मंदिर समितीला देणार आहे. ABP माझाने वज्रलेपानंतरही मूर्तीची होत असलेली धक्कादायक झीज दाखविल्यानंतर आता भारतीय पुरातत्व विभाग आपल्या पाहणीनंतर नेमकं लेपन कधी करायचं आणि कोणती काळजी घ्यायची? याबाबत अहवाल देणार आहे. किमान आता तरी मंदिर समिती या अहवालाची गांभीर्यानं दखल घेणार का? हाच प्रश्न राहणार आहे. सध्या तरी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी पुरातत्व विभागाच्या सूचनांचे पालन करण्याची भूमिका घेतली आहे.