अहमदनगर : राज्यात उन्हाचा तडाखा वाढलाय. मागील काही दिवसात अंगाची लाही-लाही होतेय. यंदाचा उन्हाळा अधिकच तापदायक ठरतोय. राज्यात अनेक ठिकाणी तर तापमान काही ठिकाणी 46 अंशांपर्यंत पोहोचलं आहे. याचा परिणाम मानवी जीवनावर होत आहे. याचा फटका सध्या पोल्ट्री व्यवसायाला मोठ्या प्रमाणात बसू लागला आहे. उष्माघाताने कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढलं आहे. अहमदनगर जिल्ह्यात तापमान 40 अंशाच्या पार गेलं आहे. त्यामुळे कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण तर वाढलं आहेच सोबतच अंडी उत्पादनातही घट झाली आहे.  


सध्या सूर्य आग ओकतोय. याचा फटका जसा माणसांना बसतोय, तसाच तो पशु पक्षांनाही बसतोय, जिल्ह्यात वाढत्या उन्हामुळे पोल्ट्री व्यवसायिकांच्या चिंता वाढल्यात.  जिल्ह्यात 700 पोल्ट्री फार्म हे अंडी देणाऱ्या पक्षांचे आहेत तर मांसल पक्षांचे 3500 पोल्ट्री फार्म आहेत. तापमान 30 अंशांपार गेल्यास पक्षांची मर वाढते. जिल्ह्यात पारा वाढल्याने पोल्ट्री व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत.


उन्हासोबतच भारनियमनाचा देखील फटका


उन्हासोबतच अनेक भागात विजेच भारनियमन , कमी दाबाने वीज पुरवठा होणे. यामुळेही व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. भारनियमनामुळे पाण्याला ताण पडतोय. फॉगरसाठीही पाणी उपलब्ध होत नाही. गेल्यावर्षीच्या तुलनेत 10 ते 12 टक्क्यांनी मर वाढली असल्याचे पोल्ट्री व्यावसायिक सांगतात. कंपनीकडून 5 टक्के मर ग्राह्य धरून व्यावसायिकांना मोबदला दिला जातो. मात्र, मर वाढल्याने पोल्ट्री व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.


उष्णतेपासून पक्षांची अशी काळजी घ्या


उष्णतेपासून पक्षांची काळजी घेण्यासाठी पोल्ट्री व्यावसायिकांनी शेडमध्ये फॉगरची सुविधा करणं गरजेचं आहे. सोबतच शेडवर चुन्याचा लेप लावणे, शेडवर नारळाच्या झावळ्या किंवा गवताचे आच्छादन टाकणे गरजेचे आहे तसेच पोल्ट्री शेडमध्ये पंखा किंवा कुलर लावणे देखील गरजेचे आहे.
 
उन्हाळ्यात मांसल कोंबड्यांची मागणी घटते, त्यामुळे कंपनीकडून पक्षांची उचल वेळेत होत नाही. त्याचा फटका पोल्ट्री व्यावसायिकांना बसतो आहे. त्यामुळे सध्या नैसर्गिक संकटासोबतच कंपनीमुळेही पोल्ट्री व्यावसायिकांचे नुकसान होत आहे.