मुंबई: पुण्यात असताना पीएमपीएलच्या गाडीने आईला धडक दिली आणि तिचा अपघात झाला, नंतर पुढचे दिवस कसे काढायचे हा प्रश्न होता, मग जगण्याचं साधन म्हणून या डान्सच्या क्षेत्रात आली असं सांगत गौतमी पाटीलने ( Gautami Patil ) आपल्या आयुष्याचा प्रवास उलगडला. वडील त्यावेळी वाईट वागले नसते तर आमच्यावर ही वेळच आली नसती, मी देखील या क्षेत्रात आली नसते असं सांगताना ती भावुक झाली. महाराष्ट्रातल्या मेट्रो सिटी ते ग्रामीण भागापर्यंत जिची एकच चर्चा आहे ती गौतमी पाटील आज एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमामध्ये आली होती. त्यावेळी तिने संवाद साधला.


Gautami Patil Family History : कशी आहे कौटुंबीक पार्श्वभूमी 


धुळ्यातल्या शिंदखेडा या आईच्या गावी आपलं बालपण गेल्याचं गौतमी पाटीलने सांगितलं. वडिलांचे गाव हे चोपडा आहे, पण लहानपणापासून कधीच वडिलांना पाहिलं नव्हतं. गौतमी पाटीलने सांगितलं की, माझ्या वडिलांच्या गावाकडचा काही संबंध नाही. दोन मामा,  मावशी आणि त्यांची मुलं, आईचे वडील असं आमचं कुटुंब. आई आणि मी आजोबा हे तिघेच गावात राहायचो, मामा पुण्याला राहायचे. आईच्या वडिलांनी म्हणजे आजोबांनीच मला सांभाळलं. पण त्यानंतर आठवीत असताना पुण्याला आले. त्याच ठिकाणी दहावीपर्यंतचं शिक्षण झालं. 


वडिलांची ओळखही नव्हती, पण पुण्यात आल्यानंतर मामांनी त्यांना नोकरी लावली आणि त्यांच्यासोबत राहायला लागलो असं गौतमी म्हणाली. तिने सांगितलं की, वडील खूप दारू प्यायचे. पुण्यात आल्यानंतरही वडिलांचे दारू पिणे सुरूच होतं. त्यामुळे अनेक किस्से घडले, त्यामुळे आम्ही वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. 


Gautami Patil Dance Career : आईचा अपघात झाला आणि जगण्यासाठी डान्सच्या क्षेत्रात आली


गौतमी पाटील डान्सच्या क्षेत्रात कशी आली असा प्रश्न विचारल्यानतंर ती म्हणाली की, मला लहानपणापासून डान्स करण्याची आवड होती. शाळेत असताना पहिला डान्स हा 'चला जेजुरीला जाऊ' या गाण्यावर केला होता. पुण्यात आल्यानंतर आईची अपघात झाला आणि मग तिच्याकडून काम होत नव्हतं. काही दिवस आम्ही कसेतरी काढले. मग आईने मंगळसूत्र गहाण ठेवले. त्यानंतर एके दिवशी आईच्या मैत्रिणीने पुण्यातील महेंद्र बनसोडे या लावणी शिकवणाऱ्या शिक्षकांची भेट घालून दिली. मग नंतर त्यांच्याच अकॅडमीमध्ये लावणीची प्रॅक्टिस सुरू केली. घुंगरू आणण्यासाठी मला 500 रुपये आणायला लावले, पण परिस्थिती नव्हती. मग कसेतरी पैसे गोळा केले आणि काम सुरू केलं. 


Gautami Patil Lavani : अकलूजच्या कार्यक्रमात पहिला डान्स


सार्वजनिक आयुष्यातील पहिला डान्स केला तो अकलूजच्या कार्यक्रमात असं गौतमी पाटील म्हणाली. ती म्हणाली की, अकलूज लावणी महोत्सवात मी बॅक डान्सर होते. तो माझा पहिला कार्यक्रम होता. त्यावेळी आमच्या ग्रुपला प्रथम क्रमाकांचे बक्षीस मिळाले. त्यानंतर माझा या क्षेत्रात जम बसला.  


Gautami Patil Programme : वाघोलीत स्वतःचा पहिला कार्यक्रम


वाघोलीचा कार्यक्रम हा आपला स्वतःचा पहिला कार्यक्रम असल्याचं गौतमी पाटीलने सांगितलं. त्यावेळी आपल्याला भीतीही वाटत होती आणि उत्सुकताही वाटत होती असं तिने सांगितलं. ती म्हणाली की, वाघोलीतील कार्यक्रम चांगला झाला आणि त्यानंतर अनेक ठिकाणाहून मागणी येऊ लागली. एवढी प्रसिद्धी वाट्याला येईल असं कधीही वाटलं नव्हतं. धुळ्यातील एका गावातून येणारी मुलगी एवढी वाटचाल करेल असं वाटलं नव्हतं. 


Gautami Patil On Viral Video : व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवर काय म्हणाली गौतमी? 


मध्यंतरी गौतमी पाटीलचा कपडे बदलतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यावर बोलताना गौतमी म्हणाली होती की, तो व्हिडीओ पाहून मला धक्काच बसला. त्यावेळी सगळं संपलं, आता आपण थांबायचं असंच वाटू लागलं होतं. लोकांना आपली प्रगती बघवत नाही मग ते इथपर्यंत जातात याचं वाईट वाटलं. पण मी थांबले तर त्यांच्या मनापर्यंत होणार. म्हणून मी नव्याने सुरूवात केली. समोरून मला रिस्पॉन्स कसा येईल, लोक काय बोलतील याची भीती
पण लोकांचे आभार, त्यांनी मला सांभाळून घेतलं. प्रेक्षकांनी साथ दिली नसती तर उभी राहू शकली नसते, महिला वर्गानेही सपोर्ट केला.