Chhatrapati Sambhaji Nagar News : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी करत गेल्या तीन दिवसांपासून सकल मराठा समाजाकडून छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhaji Nagar) क्रांती चौकात आंदोलन करण्यात येत आहे. 1 मे पासून या ठिय्या आंदोलनाला सुरवात झाली असून, आज तिसऱ्या दिवशी देखील आंदोलन सुरूच आहे. दरम्यान ओबीसीतून आरक्षण द्या, अन्यथा तेलंगणात जाण्याची परवानगी द्या अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली आहे. 


यावेळी आंदोलनात सहभागी असलेले प्रा. चंद्रकांत भराट म्हणाले की, मराठवाडा हा आंध्र प्रदेशचा एक भाग होता. पुढे 1960 सालापर्यंत मराठा समाजाचा इतर मागासवर्गात समावेश होता. पण संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली त्यावेळेस मराठवाडा विनाअट महाराष्ट्रात सामील झाला. मराठवाडा तेव्हाच संयुक्त महाराष्ट्रात सामील झाला नसता तर आज आंध्र प्रदेशात मराठा जातीचा समावेश ओबीसीमध्ये असल्यामुळे मराठा समाजाची नोंद इतर मागास वर्गात राहिली असती. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने आम्हाला ओबीसीतून आरक्षण द्यावे, अन्यथा तेलंगणात जाण्याची परवानगी द्यावी अशी मागणी भराट यांनी केली आहे.  


आयोग स्थापन करून सर्वेक्षण करावे लागणार


दरम्यान अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी आंदोलकांची भेट घेतली. तसेच आंदोलकांशी चर्चा देखील केली आहे. तर मराठा समाजाला आरक्षणासाठी मराठा समाज हा मागास आहे हे ठरवावे लागणार असल्याने पुन्हा आयोग स्थापन करून सर्वेक्षण करावे लागणार असल्याचे नरेंद्र पाटील यांच्याकडून सांगण्यात आले. 


अतुल सावे यांची भेट... 


मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात सकल मराठा समाजाच्यावतीने ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे. दरम्यान राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे यांनी देखील आंदोलनकर्ते यांची भेट घेतली आहे. तसेच त्यांच्या मागण्यासंदर्भात चर्चा देखील केली आहे. सोबतच  मराठा आरक्षणप्रश्री मुख्यमंत्री, तसेच उपमुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचं सावे म्हणाले. तर आंदोलकांचेही मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांशी बोलणे करून देणार असल्याचे आश्वासन दिले आहे. 


आंदोलनाचा तिसरा दिवस...


गेल्या 30 वर्षांपासून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी सतत करण्यात येत आहे. विशेष म्हणजे आरक्षण देण्यासाठी सरकार सकारात्मक असल्याच्या अनेकदा घोषणा देखील झाल्या. मात्र प्रकरण  न्यायालयात असल्याने पुन्हा एकदा आरक्षण रद्द झाला. त्यामुळे मराठा समाज पुन्हा एकदा न्यायालयात गेले असून, न्यायालयात लढाई सुरूच आहे. अशात रस्त्यावरील लढाई देखील सतत पाहायला मिळत आहे. त्याचाच एक भाग म्हणजे गेल्या तीन दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर शहरात सकल मराठा समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Crime News : फुकटच्या पाणीपुरीसाठी खुनी हल्ला; छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक घटना