माझा कट्टा : देशातील बहुतांश शेतकरी आज विविध समस्यांशी झगडत आहे. मात्र पारंपरिक शेती न करता आधुनिक शेतीचा हात धरल्यास यश नक्की मिळतं, हे दाखवून देणारे प्रयोगशील शेतकरी आणि अभिनव फार्म क्लबचे संस्थापक ज्ञानेश्वर बोडके हे आज माझा कट्ट्यावर उपस्थित होते. एक बातमी वाचली आणि नोकरी सोडून दहा लाख कर्ज काढून शेती करण्याचा निर्णय घेतल्यापासून ते कोट्यवधींची उलाढाल कशी झाली हा प्रवास त्यांनी सर्वांना सांगितला. या प्रवासात त्यांनी एकट्याने शेती न करता सामूहिक शेतीचा मार्ग निवडला आणि तो यशस्वी करुन दाखवला. आज अनेक नवोदित शेतकऱ्यांसाठी ज्ञानेश्वर बोडके एक आदर्श आहेत.
आज अभिनव फार्म क्लबसोबत दीड लाख शेतकरी जोडले आहेत. त्यात 305 लीडर आहेत. सर्वांना कामं वाटून दिली आहे. यामध्ये विविध ग्रुप तयार केले आहे. अभिनव फार्म क्लब देशात तीन साडेतीन लाख लोकांना भाजीपाला पुरवतो आणि लाखो लोक वेटिंगवर आहेत. मागच्या वर्षी अभिनव क्लबची 431 कोटींची उलाढाल झाली होती. यावर्षी नक्कीच दहा टक्के वाढ होईल अशी आशा ज्ञानेश्वर बोडके यांनी व्यक्त केली.
अभिनव क्लबमार्फत नाबार्डच्या मदतीने 2006 आम्ही ट्रेनिंग सेंटर उभं केलं आहे. तेव्हापासून बॅच सुरु झाल्या आहेत त्या आजही सर्व बॅच फुल आहेत, आजही सहा-सहा महिन्याचं वेटिंग आहे. पीक लागवडीपासून विक्रीपर्यंतचं शिक्षण आम्ही येथे देतो, असं बोडके यांनी सांगितलं. हवामानाच्या लहरीपणाचा फटका बसू नये म्हणून शेड हाऊस उभारलं. त्यामुळे अवकाळी पाऊस, गारपीटीचा फटका फार आम्हाला बसला नाही, असं बोडके यांनी सांगितलं.
शेतकऱ्यांना शेतमाल विकताना दलालांमुळे मोठा फटका बसतो. मात्र दलालांना काढलं तर शेतकरी माल कुठे विकणार असा प्रश्न निर्माण होतो. दलाल काढून हा प्रश्न सुटणार नाही. तर शेतकऱ्यांनी आपला माल थेट ग्राहकापर्यंत पोहोचवला पाहिजे. शेतकऱ्यांच्या आजूबाजूची व्यवस्थाही खराब आहे. शेतकऱ्यांना सातबारासाठीही पैसे द्यावे लागतात. शेतकऱ्यांचे रक्षकचं भक्षक बनले आहेत. व्यवस्थेमुळे शेतकरी आज अडचणीत आहे, असं ज्ञानेश्वर बोडके सांगतात.
मला एकट्याला श्रीमंत व्हायचं नाही. माझ्यासोबत इतर शेतकरी मोठे झाले पाहिजे. आज लाखो शेतकरी आमच्यासोबत जोडले आहेत. तर रोज शेकडो लोक आमचं शेत पाहायला येतात, यामध्ये अनेक दिग्गजांना समावेश आहे. आज आमच्या कामामुळे अभिनव ग्रुपला चार राष्ट्रीय पुरस्कार आहेत. 220 बाकीचे पुरस्कार आहे. आम्ही चुकीचं काम करत नाहीत, लोकांना चांगलं द्यावं हा आमचा उद्देश आहे, असंही ज्ञानेश्वर बोडके यांनी सांगितलं.