Abdul Sattar: गायरान जमीन घोटळाप्रकरण आणि सिल्लोडमधील कृषी महोत्सवावरून कृषी मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) अडचणीत आले आहे.  सिल्लोडमधील कृषीप्रदर्शनासाठी पैसे गोळा करण्याचे आयुक्तांना आदेश देणारे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचे  पत्र एबीपी माझाच्या हाती लागले आहे. या पत्रानुसार कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी सहा विभागांना प्रत्येकी वीस लाख असे एकूण एक कोटी वीस लाख रुपये जमा करण्याचे आदेश दिले होते. औरंगाबादच्या विभागीय कृषी संचालकांकडे पैसे जमा करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले होते.


कृषी प्रदर्शनासाठी प्रत्येकी वीस लाख असे एकूण एक कोटी वीस लाख रुपये जमा करण्याचे आदेश देणाऱ्या पत्रावर कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांची सही आहे. कृषी विभागाच्या वेगवेगळ्या सहा विभागांसाठी हे आदेश देण्यात आले होते.  या सहा विभागांनी प्रत्येकी प्रत्येकी वीस लाख असे एकूण एक कोटी वीस लाख रुपये औरंगाबादच्या विभागीय कृषी संचालकांकडे सिल्लोड महोत्सवासाठी  जमा करण्याचे आदेश दिले होते. आकस्मिक निधी म्हणून वापरण्यात येणारा निधी हा सिल्लोड कृषी प्रदर्शनासाठी वळवण्याचे आदेश या पत्रात देण्यात आले आहे.


 सिल्लोड महोत्सवाच्या आयोजनाचे काम हे एका खासगी कंपनीला देण्यात आले होते. सिल्लोड कृषी प्रदर्शनात शेतीशी संबधित अवजारे, खते, बियाणे आदी गोष्टी विक्री करणारे विक्रेते यांना देखील प्रवेशिका देण्यात आल्या होत्या. तसेच त्यांच्याकडून देखील निधी जमा करण्याचे आदेश कृषी अधिकाऱ्यांनी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.


कॉंग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार म्हणाले, आयुक्तांनी विभागप्रमुखाला आकस्मिक निधी देण्याचे जे आदेश दिले आहेत ही हुकुमशाही आहे. हे अतिशय गंभीर आहे.  कृषी विभागाचे प्रदर्शन भरवणे, शेतकऱ्यांना माहिती देणे, प्रशिक्षण देणे हे कृषी विभागाचे काम आहे. कृषी प्रदर्शनाचे आयोजन केलेच पाहिजे पण ते होत असताना काही निकष आहेत. आकस्मिक निधी वापरण्याचे  स्वतंत्र अधिकार विभागप्रमुखाला आहेत. परंतु  आयुक्तांनी विभागप्रमुखाला आकस्मिक निधी देण्याचे जे आदेश दिले आहेत ही हुकुमशाही आहे. 


गायरान जमीन घोटळाप्रकरण आणि सिल्लोडमधील कृषी महोत्सवावरून कृषी मंत्री अब्दुल सत्तार अडचणीत आले आहेत.  या दोन आरोपांवर विरोधकांनी रान उठवल्यानंतर सत्तारांनी विरोधकांच्या आरोपांवर विधानसभेत उत्तर देणार असल्याचं सांगितलं होतं. मात्र काल दिवसभरात त्यांनी अधिवेशनात एक चकार शब्ददेखील काढला नाही.. त्यामुळे अब्दुल सत्तार आज तरी बोलणार का याकडे लक्ष लागलंय.