Soybean Farmer: गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये सोयाबीनच्या रकमेवरून वेगळाच प्रकार घडल्याचं समोर आलंय. सोयाबीनच्या खरेदी केंद्रात बँक खात्यात माहिती टाकताना शुन्याऐवजी इंग्रजीतील O टाकले गेल्यानं सोयाबीनची रक्कमच खात्यात जमा झाली नाही. अकोल्यातील वाडेगावच्या नाफेड खरेदी केंद्रात हा प्रकार घडला आहे. असाच प्रकार काही दिवसांपूर्वी बुलढाण्यातही घडला होता. संबंधित कार्यालयातील चुकीमुळे शेतकऱ्यांना आता वारंवार पैशासाठी चकरा मारण्याची नामुष्की ओढावली आहे. माहिती भरताना झालेल्या एका चुकीनं हजारोंची रक्कम रखडली आहे. अकोल्यातील बाळापुरात 27 शेतकऱ्यांना या चुकीचा फटका बसलाय.


नाफेडकडून वाडेगावच्या केंद्रात सोयाबीन खरेदी सुरु करण्यात आली होती. याकरता शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करून बँक पासबुकची झेरॉक्स व इतर कागदपत्रे जमा केल्यानंतरही माहिती भरताना चूक झाल्याने हा प्रकार घडलाय. शेतकऱ्यांना आता त्यांच्याच पैशांसाठी कार्यालयात चकरा माराव्या लागत आहेत.यावर अधिकारीही टोलवाटोलवीची उत्तरे देत असल्याची तक्रार शेतकरी करत आहेत.


अधिकाऱ्यांची टोलवाटोलवी


ऑनलाईन नोंदणीसाठी कागदपत्रं आणून दिल्यानंतरही माहिती भरताना चूका झाल्याने शेतकऱ्यांचे पैसे मिळण्यास दिरंगाई होत आहे. यावर मुंबईच्या नाफेड कार्यालयातून पैसे मिळतील असं मोघम उत्तर देत अधिकारी टोलवाटोलवी करत असल्याचंही सांगण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पैसे मिळण्यासाठी उशीर होत असल्याची ओरड होत आहे.


सोयाबीन खरेदीला मुदतवाढ


महाराष्ट्र सरकारच्या विनंतीवरुन केंद्र सरकारनं सोयाबीन खरेदीची मुदत 31 जानेवारीपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा राज्यातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. अनेक शेतकऱ्यांची सोयाबीन विक्री बाकी आहे. मुदवाढ दिल्यामुळं हमीभावात शेतकऱ्यांच्या सोयाबीनची विक्री करता येणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या विनंतीवरुन केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंहे चौहान यांनी हा निर्णय घेतला आहे. यापूर्वी ही खरेदी आजपर्यंत म्हणजे 13 जानेवारी पर्यंत करण्याचे होते निर्देश होते. आता सोयाबीन खरेदीला मुदतवाढ देण्यात आली आहे. आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषीमंत्री चौहान यांना फोन करतक मदतवाढ देण्याची मागणी केला होती. त्यांच्या या मागणीला यश आलं आहे. 


नोव्हेंबरमध्ये सुरू होणाऱ्या सोयाबीन खरेदीची तयारी ऑक्टोबरमध्येच करा, फडणवीसांच्या सूचना 


दरवर्षी पणन विभागामार्फत सोयाबीनची खरेदी केली जाते. ही खरेदी कोणत्याही अडथळ्याशिवाय होण्यासाठी विभागाने कायमस्वरूपी यंत्रणा उभारावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. सह्याद्री अतिथीगृह येथे आज पणन विभागाकडून 100 दिवसात करण्यात येणाऱ्या कामाचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. पुढील वर्षीपासून राज्यात नोव्हेंबरमध्ये सुरू होणाऱ्या  सोयाबीन खरेदीसाठीची  तयारी ऑक्टोबरमध्ये पूर्ण करण्याच्या सूचना देऊन देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शेतकऱ्यांची नोंदणीही ऑक्टोबरमध्ये पूर्ण करावी. सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरूपी उभारण्यात येणाऱ्या व्यवस्थेचे निकष ठरवावे. त्यामध्ये सर्व सोयी सुविधांचा अंतर्भाव असावा. कोणत्याही अडचणीशिवाय सोयाबीन खरेदी सुरू राहिली पाहिजे, अशी यंत्रणा उभी करावी.