Sant Tukaram maharaj Beej : आज संत तुकाराम महाराज यांचा बीज सोहळा संपन्न होत आहे. या सोहळ्यासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येनं भाविक देहूत दाखल झाले आहेत. संत तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठ गमनाचा हा दिवस आहे. कोरोनाच्या संकटामुळे गेल्या दोन वर्षापासून हा सोहळा साजरा करण्यात आला नव्हता. मात्र, यावेळी मोठ्या संख्येनं भाविक देहूत आले असून, ज्ञानोबा तुकोबांच्या विठुरायाच्या गजरात दंग झाली आहे.


संत तुकाराम महाराज हे सतराव्या शतकातील सामाजिक प्रबोधनाची मुहूर्तमेढ रोवणारे निर्भीड कवी होते. समाजाच्या तळागाळातील लोकांनाही सहज उमजतील, अशा संतरचना तुकारामांनी केल्या. राज्याच्या विविध कानाकोपऱ्यांतून हजारो भाविक आणि दिंड्या शनिवारी देहूत दाखल झाल्या आहेत. त्यामुळं देहूनगरी विठुनामाच्या गजरात दंग झाली आहे. गावात ठिकठिकाणी गाथा पारायण सोहळा आणि अखंड हरिनाम सप्ताह सुरु आहेत. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी संत तुकाराम महाराज देऊळवाडा आणि वैकुंठस्थान मंदिरात देहूरोड पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. त्यामुळे देहूला छावणीचे स्वरुप आले आहे. शनिवारपासूनच मुख्य देऊळवाड्यात आणि वैकुंठस्थान मंदिरात पहाटेपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. वडिवळे धरणातून इंद्रायणी नदीला पाणी सोडल्याने इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहत आहे. 




गेल्या दोन वर्षापासून देशावार, राज्यावर कोरोनाचं संकट होते. त्यामुळे वारकरी सांप्रदायाच्या सर्व कार्यक्रमांवर बंधने घालण्यात आली होती. मात्र, आता कोरोनाचा धोका कमी झाला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणचे निर्बंध हटवण्यात आले आहेत. कोरोनाचा धोका कमी झाल्यामुळेचं देहूत आज भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. देशातील कोरोनाचं संकट लवकर जाऊ दे असं साकडं तुकाराम महाराजांना घातले असल्याचे भाविकांनी सांगितले. आजचा दिवस आमच्यासाटी धन्य असल्याचे असे वारकऱ्यांनी सांगितले. तसेच तुकाराम महाराज यांचा पदस्पर्श आज होणार असल्यानं आम्हाला खूप आनंद झाला असल्याचे वारकरी म्हणाले.




तुकाराम महाराज हे साक्षात्कारी व निर्भीड संत कवी होते. विशिष्ट वर्गाची पारंपरिक मक्तेदारी असलेला वेदार्थ तुकोबांच्या अभंगवाणीतून सामान्य जनांपर्यंत प्रवाहित झाला. संत तुकारामांचे अभंग महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे महान द्योतक आहेत. वारकरी, ईश्र्वरभक्त, साहित्यिक, अभ्यासक व सामान्य रसिक आजही त्यांच्या अभंगांचा अभ्यास करतात. भागवत धर्माचा कळस होण्याचं भाग्य त्यांना लाभलं. महाराष्ट्राच्या हृदयात अभंगरूपाने तुकोबा स्थिरावले आहेत. त्यांच्या अभंगांत परतत्त्वाचा स्पर्श आहे. तुकोबांच्या काव्यातील गोडवा व भाषेची रसाळता अतुलनीय आहे. 




ज्ञानेश्वरानंतर जनार्दन स्वामी, एकनाथ महाराज, नामदेव आणि त्यानंतर संत तुकाराम यांनी भागवत धर्माची पताका सर्वत्र फडकवली. भागवत धर्माचा कळस ठरलेल्या संत तुकारामांनी बहुजन समाजामध्ये पसरलेली धर्म-कर्मकांडाची जळमटे आपल्या कीर्तनातून पुसून टाकली. अभंगवाणी महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये वसली. अभंगवाणीतून सत्यधर्माची शिकवण जगाला संत तुकाराम यांनी दिली. सामाजिक परिवर्तनाची वादळ सर्वत्र पसरले. जाती-धर्माची उतरंड त्यांनी मोडून काढली. गुलामगिरीची चौकट मोडली.