पंढरपूर : विठुरायाच्या दर्शनासाठी लाखो भक्त जगभरातून येत असतात आणि त्या देवाचे सावळे रूप मनात साठवत अनामिक ऊर्जा घेऊन परत जात असतात. पण एखादा असा भक्त केवळ दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर जेव्हा देवाला भेटतो तेंव्हा देवालाही याचा खरा आनंद होत असणार आणि यामुळेच आपल्या विवाहापूर्वी एका लाडक्या भक्ताला दर्शन दिल्याचा आनंद आज साक्षात देवालाही मिळाला आहे.


सोलापूर येथील एक तरुण डॉक्टर राजाराम ज्ञानेश्वर होमकर याना एका अपघातात दुर्दम्य व्याधी लागली आणि यामुळे गेल्या चार वर्षांपासून त्यांच्या शरीराचा कोणताही अवयव हालचाल करू शकत नसल्याने ते संपूर्णपणे झोपून आहेत . गेल्या काही दिवसापासून विठ्ठल दर्शनाची अंतिम इच्छा ते आपल्या वडिलांना बोलून दाखवत होते . अखेर सोमवारी दुपारी होमकर कुटुंब आणि त्यांचे डॉक्टर मित्र रुग्णवाहिकेतून या चाळीस वर्षाच्या विठ्ठल भक्ताला स्ट्रेचरवर झोपवून पंढरपुरात आले.


मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांना त्यांच्या कुटुंबाने डॉक्टर राजाराम यांची कैफियत सांगितली मात्र मंदिरात फारतर व्हीलचेअर वर बसवून दर्शनाला न्यायाची व्यवस्था आहे आणि दर्शनालाही मोठी गर्दी होती . डॉ राजाराम याना व्हील चेअरवर काय कशातच बसता येत नसल्याने त्यांना फक्त स्ट्रेचर वरूनच दर्शनासाठी न्यावे लागणार होते . अखेर निराश झालेल्या डॉक्टरांच्या वडिलांनी त्यांना नामदेव पायरीचे दर्शन घडवतो असे सांगून परत फिरायची तयारी केली.


Vasant Panchami 2021 | सावळे सुंदर, रुप मनोहर...


दरम्यान, यावेळी देवाच्या पोशाखाची झाल्याने दर्शन रांग बंद झाली होती. या असहाय्य डॉक्टरांची दुर्दम्य इच्छाशक्ती पाहून जोशी यांनी मंदिराच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्यांना विठ्ठलासमोर नेले आणि देवाला त्याच्या एका अनोख्या भक्ताची भेट झाली. देवाच्या दर्शनानंतर आपली अखेरची इच्छा पूर्ण झाल्याचे आनंदाश्रू डॉ राजाराम यांच्या डोळ्यात होते . आता तुम्हाला देव भेटला, निराश होऊ नका विठुरायाचे तुम्हाला पुढच्यावेळी आपल्या पायावर चालत इथे आणेल अशा सदिच्छा मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिल्या. एक अनामिक समाधान घेऊन डॉक्टर राजाराम आणि होमकर कुटुंब पुन्हा सोलापूरच्या वाटेला लागले. तिथं मंदिरातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावरही या घटनेनंतर आनंद दिसत होता .