Pandharpur | विठ्ठल रुक्मिणीचा शाही विवाह सोहळा, मंदिराला पाच टन फुलांची सजावट

Continues below advertisement

पंढरपूर : वसंतपंचमी अर्थात वसंताचा म्हणजेच निसर्गाचा उत्सव, तो सतत सुंदर भासणारा निसर्ग वसंत ऋतूत सोळा कलांनी फुलून उठतो. आणि याच मुहूर्तावर साक्षात परब्रह्म पांडुरंग आणि जगन्माता रुक्मिणीचा विवाहसोहळा संपन्न होत असतो. या आगळ्या-वेगळ्या विवाहाची उद्या सकाळीपासून सुरु होणारी धामधूम पंढरपुरकर व लाखो भाविकांना घरीच बसून पाहावी लागणार आहे. यंदाचा विवाह सोहळा खास असून या विवाहसोहळ्यासाठी साक्षात ब्रह्मदेव सरस्वती, शंकर पार्वती, विष्णू महालक्ष्मी, बालाजी पद्मावती, राधा कृष्ण या जोड्यांसह गणपती, नारदमुनी यासारखे स्वर्गातील देवही उपस्थित राहणार आहेत.

पुण्यातील फुल सजावटीची सेवा देणारे भारत भुजबळ ही संकल्पना मूर्तरूपात आणत आहेत, तेही फुलासाजवटी मधून. असे असले तरी कोरोनाचे संकट अजून गेले नसल्याने देवाच्या विवाहातही कोरोनाची सर्व बंधने पाळावी लागणार आहेत. यंदा वधू -वर अर्थात विठुराया व रुक्मिणी मातेचा विवाहाचा पेहराव बंगलोर येथील प्रसिद्ध फॅशन डिझायनर सविता चौधरी यांनी डिझाईन करून अर्पण केला आहे.

वसंतपंचमी ते रंगपंचमी या काळात देवाला व रुक्मिणीमातेला पांढरे कपडे वापरण्याची परंपरा असल्याने देवासाठी खास पांढऱ्या रंगाची अंगी व उपरणे बनवण्यात आले आहे. यावर विष्णूच्या शुभ खुणा असलेला शंख, चक्र व ओम विविध प्रकारच्या रंगीबेरंगी मोत्याच्या बनविण्यात आले आहे. रुक्मिणी मातेलाही अतिशय उंची सिल्कची कांजीवरम साडी निवडण्यात आली आहे. तसे दरवर्षी देवाचा पोशाख खास असला तरी यंदा तो फॅशन डिझायनरने बनवून अर्पण केल्याने पहिल्यांदाच देवाला असा खास बनविलेला पोशाख विवाहात घातला जाणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram