मुंबई : ‘महाराष्ट्र बंद’च्या दिवशी म्हणजे 3 जानेवारीला नागपुरात अत्यंत खडतर परिस्थितीत मध्यरात्री धावत्या कॅबमध्ये एका चिमुकल्याने जन्म घेतला. तो सध्या सर्वांच्या चर्चेचा विषय बनला आहे. जन्मतःच 5 वर्षांचा मोफत प्रवास मिळवणारा तो चिमुकला कोण आहे? त्याच्यासाठी धावून आलेला कॅब ड्रायव्हर कोण? यावर एबीपी माझाचा विशेष रिपोर्ट


4 जानेवारी रोजी पहाटे जन्मलेल्या बाळाचं अजून नामकरणही झालेलं नाही. मात्र, त्याआधीच हा चिमुकला नागपुरात सर्वांच्या चर्चेचा विषय बनला आहे. ‘महाराष्ट्र बंद’च्या मध्यरात्री जेव्हा नागपुरात कोणतंही वाहन धावत नव्हतं, तेव्हा या बाळाने ओला कॅबमध्ये जन्म घेतला.

धावत्या ओला कॅबमध्ये 3 जानेवारीला रात्री 12 च्या सुमारास पांजरा परिसरात राहणाऱ्या कांचन मेश्राम यांना प्रसूती वेदना सुरु झाल्या. त्यांच्या कुटुंबीयांनी ऑटो शोधत संपूर्ण परिसर पिंजून काढला. मात्र, महाराष्ट्र बंद असल्यामुळे कोणतंही वाहन मिळालं नाही. अशातच कांचन मेश्राम यांच्या मोठ्या बहिणीने ओला कॅबसाठी फोन केला.

सुरुवातीला कांचन राहत असलेल्या पांजरा परिसराच्या जवळपास कुठलीच कॅब उपलब्ध नव्हती. सुमारे 10 किलोमीटर लांब सदर परिसरात शहजाद खान यांची कॅब उपलब्ध होती. महाराष्ट्र बंदच्या रात्री 10 किलोमीटर लांब पांजरासारख्या निर्जन भागात जाणं धोकादायक तर ठरणार नाही ना, असा विचार करून सुरुवातीला शहजाद खानही घाबरले. मात्र, पलीकडे काहीतरी आपतकालीन परिस्थिती आहे हे लक्षात घेत शहजाद यांनी जाण्याचा निर्णय घेतला.



कॅब घरी पोहोचली तोपर्यंत कांचन यांच्या वेदना प्रचंड वाढल्या होत्या. सर्वांनी त्यांना धीर दिला आणि 10 किलोमीटर लांब असलेल्या डागा रुग्णालयकडे कॅब निघाली. मात्र, रुग्णालयात पोहोचण्याच्या आधीच कॅबमध्ये बाळाचा जन्म झाला.

कांचन यांची परिस्थिती खूप नाजूक होती. त्यांच्या वेदना आणि विव्हळणं पाहून शहजाद खान सुरुवातीला खूप घाबरले होते. बाळंतीण महिलेला काही झाल्यास आपल्याला दोष दिला जाईल, अशी भीती त्यांना वाटत होती. मात्र, प्रसूती वेदना झेलणाऱ्या महिलेला डॉक्टरपर्यंत सुरक्षित पोहोचवणं हे आपलं माणूस म्हणून कर्तव्य आहे हे लक्षात घेत त्यांनी काळजीने कॅब चालवली. मात्र, कॅब रुग्णालयात पोहोचण्याच्या आधीच बाळाने कॅबच्या मागच्या सीटवर आजीच्या मदतीने जन्म घेतला होता. आई आणि बाळ दोघांना डॉक्टरांच्या सुरक्षित हातात सोपवल्यानंतर खूप समाधान वाटल्याचं शहजाद खान सांगतात.



त्या रात्री शहजाद खान मदतीला धावून आले नसते तर परिस्थिती काय झाली असती याची कल्पना करूनच कांचन मेश्राम यांना आजही रडू कोसळतं. संपूर्ण राज्य बंद असताना धोका पत्करून मध्यरात्री धावून येणारे शहजाद खान माझ्यासाठी देवदूतच ठरले, अशी त्यांची भावना आहे.

शहजाद खान यांच्या कामगिरीला पाहून ते काम करत असलेल्या ओला कंपनीने त्यांना ड्रायवर ऑफ द मंथ म्हणून निवड केली आहे. शिवाय धावत्या कॅबमध्ये जन्मणाऱ्या बाळाला आणि त्याची आई कांचन मेश्राम या दोघांना ओला कंपनीने पुढील 5 वर्षांचा राईड मोफत देण्याचा निर्णयही घेतला आहे. त्यामुळे खडतर परिस्थितीत जन्मलेला हा बाळ त्याचं नामकरण होण्याआधीच नागपुरात सर्वांच्या उत्सुकतेचा विषय ठरला आहे.