मुंबई : रत्नागिरीत होऊ घातलेल्या नाणार ग्रीन रिफायनरीला महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सर्वेसर्वा नारायण राणे यांनी तीव्र शब्दात विरोध केला आहे. हा प्रकल्प कोकणात आणण्याचा घाट शिवसेनेने घातल्याची टीका राणेंनी केली. शिवाय, कोकण भस्मसात करण्याचा डाव सेनेचा असल्याचाही आरोप राणेंनी केला.


कोकणासंदर्भात शिवसेनेची भूमिका कायमच दुटप्पी राहिली आहे. पैशांसाठी कोकण भस्मसात करण्याचा डाव शिवसेनेचा आहे, असा आरोपही नारायण राणेंनी केला आहे.

“आम्ही नाणार प्रकल्प होऊ देणार नाही. अधिकाऱ्यांनी दम दिल्यास त्यांच्याविरोधात केसेस दाखल करु. काही झालं तरी कोकणवासीयांचा ऱ्हास करणारा प्रकल्प मी होऊ देणार नाही. मी मुख्यमंत्र्यांकडे हा विषय घेऊनच जाणार आहे. मला कोणाकडे जावं लागेल हे मला माहिती आहे.”, असे राणे म्हणाले.

18 गावातील जनतेचा, शेतकऱ्यांचा नाणार ग्रीन रिफायनरीला तीव्र विरोध असल्याचे राणे म्हणाले. शिवाय, कोकणात एकूण 13 हजार हेक्टर जमीन लागवडीखाली आहे. या भागात 7 लाख आंब्यांची झाडं आणि 2 लाख काजूची झाडं आहेत, जगातला प्रसिद्ध देवगड आंबाही याच क्षेत्रातला आहे, असेही राणेंनी सांगितले.

सांडपाण्यामुळे मासेमारीचं मोठं नुकसान होण्याची भीतीही राणेंनी यावेळी व्यक्त केली.

राज्याचे 'उद्योगी' मंत्री आणि केंद्रात अवजड उद्योग मंत्री शिवसेनेचेच आहेत. उद्धव ठाकरेंचा विरोध असेल तर तुमच्या मंत्र्यांनी प्रस्ताव मान्य का केला?, जमीन अधिग्रहणाला मान्यता का दिली?, असे सवाल राणेंनी उपस्थित केले आणि शिवसेनेवर निशाणा साधला.

“विरोध करणाऱ्या अशोक वालम यांना धमक्या दिल्या जात आहेत. सात पिढ्या बसून खाईल इतके पैसे मिळतील, असं पत्र वालम यांना देण्यात आलं. त्यांच्या पत्नीवरही केसेस टाकल्या, छळ केला. वालम यांना ‘मातोश्री’वर बोलवून दम दिला जातो आहे.“, असे गंभीर आरोप नारायण राणेंनी केला.

शिवसेनेचे पदाधिकारी दलाली करत आहेत. खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी यांनी जमिनी घेतल्याची माहिती आहे, असाही गंभीर आरोप राणेंनी यावेळी केला.