Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यातील दानोळीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका बाजुला दिवाळीच्या पूर्वसंध्येला भारत पाकिस्तान सामन्यात सर्वजण गुंग असताना दुसऱ्या बाजूला एक 3 वर्षीय मुलगा विहिरीत बुडत होता. मात्र, यावेळी भल्याभल्यांना लोकांना जे करता आले नाही ते एका 15 वर्षीय मुलीने करून दाखवत चिमुरड्याचा जीव वाचवला. यामुळे सध्या तिचं सर्वत्र कौतुक होत आहे. नम्रता कलगोंडा कटारे असे या मुलीचे नाव असून क्षणाचाही विचार न करता तिने खोल आणि काटोकाट भरलेल्या विहिरीत उडी घेत मुलाचा जीव वाचवला.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, दानोळी-जयसिंगपूर रोडलगतच्या कटारे मळ्यात कटारे कुटुंब राहते. या कुटुंबात ओजस कटारे (वय 5) आणि शौर्य कटारे (वय 3) असे दोन बालक आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वीच भारत पाकिस्तान सामना पार पडला. अटीतटीच्या या सामन्यात संपूर्ण देशाचे लक्ष टीव्हीकडे होते. तशीच काही परिस्थिती कटारे कुटुंबात देखील होती.
अशा परिस्थितीत ओजस आणि शौर्य हे बाहेरील अंगणात असलेल्या विहिरीजवळ खेळत होते. आणि यावेळी अचानक शौर्य विहिरीत पडला आणि बुडू लागला. यावेळी तेथे मोठे कोणीही नसलेले पाहून ओजस शौर्य विहिरीत बुडाला म्हणत आरडा ओरडा करू लागला. हे ऐकून सर्वजण धावत विहिरीवर पोहोचले. मात्र, कोणालाही काही समजत नव्हते. अशातच या दोघांची आत्या नम्रताने कोणताही वेळ न घालवता थेट विहिरीत कुठे घेतली आणि तीन वर्षाच्या शौर्यला बाहेर काढले.
यामुळे शौर्यचे जीवही वाचला. मात्र, भल्याभल्यांना जे सुचले नाही ते यात नववीत शिकणाऱ्या नम्रताने करून दाखवल्याने सध्या सर्वत्र कौतुक केले जात आहे. नम्रता सध्या दानोळी येथील दानोळी हायस्कूलमध्ये इयत्ता नववीत शिकत आहे. या घटनेची माहिती मिळताच दानोळी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका श्रेया वांजोळे आणि अध्यक्ष राजकुमार पारज यांनी तिने दाखविलेल्या शौर्याचे कौतुक करत तिचा सत्कार केला.
इतर महत्वाच्या बातम्या