9th May In History: इतिहासात प्रत्येक दिवसाचे महत्त्व असते. या दिवशी घडलेल्या घटनांचे परिणाम वर्तमान, इतिहासावरही घडत असतात. आजचा दिवसही अनेक अर्थाने ऐतिहासिक आहे. आजच्या दिवशी महाराणा प्रताप यांचा जन्म झाला. महात्मा गांधी यांचे गुरू, 19 व्या शतकातील उदारमतवादी राजकीय विचारवंतांच्या साखळीमध्ये एक महत्त्वाचे विचारवंत म्हणून ओळखले जाणारे गोपाळकृष्ण गोखले यांचा जन्म आजच्या दिवशी झाला. महाराष्ट्रात गरीब, बहुजन वर्गापर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा पोहचवणारे कर्मवीर भाऊराव पाटील यांचा आज स्मृतीदिन आहे.
1540 : महाराणा प्रताप यांचा जन्म
सिसोदिया घराण्यातील मेवाडचा राजपूत राजा प्रताप सिंग अर्थात महाराणा प्रताप यांचा आज जन्मदिवस. मुघल साम्राज्याच्या विस्तारवादी धोरणाचा प्रतिकार करण्यासाठी त्यांनी 1576 मधील हल्दीघाटीच्या लढाईसह मुघल सम्राट अकबराविरुद्ध अनेक मोठ्या लढाया केल्या. हल्दीघाटाच्या लढाईत महाराणा प्रताप यांनी आणि त्यांच्या सैन्याने मुघल सैन्याला सळो की पळो करून सोडले होते. दुर्देवाने महाराणा प्रताप यांची पिछेहाट झाली. त्यानंतर 1582 मध्ये, महाराणा प्रतापने दिवेर येथे मुघल चौकींवर हल्ला चढवला आणि ती ताब्यात घेतली. यामुळे मेवाडमधील मोगल सैन्याच्या सर्व 36 चौक्या ताब्यात आल्या. या पराभवानंतर अकबरने मेवाडविरुद्धची सैन्य मोहीम थांबवली. दिवेरचा विजय हा प्रतापसाठी एक मुख्य अभिमानाचा विषय होता.
1866 : भारतीय स्वातंत्र्यसेनानी, मराठी समाजसुधारक गोपाळ कृष्ण गोखले यांचा जन्म
भारतामधील ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध कायदेशीर राजकारणाच्या मार्गाने स्वातंत्र्यलढ्याचा पाया घालणाऱ्या राजकीय व सामाजिक नेत्यांपैकी एक असलेले गोपाळ कृष्ण गोखले यांचा आज जन्मदिवस. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे आघाडीचे नेते व भारत सेवक समाज या संस्थेचे संस्थापक होते. गोपाळ कृष्ण गोखले हे महात्मा गांधी यांचे गुरू समजले जातात. 19 व्या शतकातील उदारमतवादी राजकीय विचारवंतांच्या साखळीमध्ये एक महत्त्वाचे विचारवंत म्हणून गोपाळकृष्ण गोखले हे ओळखले जातात.
सामाजिक परिवर्तन घडवून आणावयाचे असेल तर घटनात्मक मार्गाचाच अवलंब केला पाहिजे असे त्यांचे स्पष्ट मत होते. जहाल विचार व सरळ प्रतिकार, सशस्त्र क्रांती यावर गोपाळ कृष्ण गोखले यांचा विश्वास नव्हता. मात्र इंग्रजांच्या न्यायबुद्धी वर उदारतेवर निष्पक्षपातीपणावर त्यांचा विश्वास होता. गोपाळकृष्ण गोखले यांनी खऱ्या अर्थाने राजकारणाला आध्यात्मिकतेत बसवले. गोखले यांच्या सांगण्यावरून महात्मा गांधींनी संपूर्ण देशाचा दौरा केला आणि अहिंसात्मक सत्याग्रहाची चळवळ देशामध्ये उभी करण्यात ते यशस्वी ठरले.
1874: मुंबईत प्रथम घोड्यांची ट्राम सुरू झाली
मुंबईत घोड्यांनी ओढल्या गेलेल्या ट्रामच्या सेवेला सुरूवात झाली. पहिली ट्राम ही बोरिबंदर ते पायधुनी दरम्यान धावली होती. घोड्यांच्या ट्रामने मुंबईतील वाहतूकीचे चित्रच पालटले. पुढे घोड्याने ओढलेल्या ट्रामचे रूपांतर हे इलेक्ट्रिक ट्राममध्ये झाले. 1873 मध्ये बॉम्बे ट्रामवे कंपनीची स्थापना करण्यात आली. या ट्रामवे कंपनीला मुंबई महापालिकेने 20 वर्षांसाठीचा परवाना देण्यात आला. 20 घोडागाडी आणि 200 घोड्यांनी ट्राम सेवेची सुरुवात झाली. त्यावेळी तीन आणे इतका तिकीट दर होता.
1928 : समाजवादी कामगार नेते वसंत नीलकंठ गुप्ते यांचा जन्म.
वसंत नीलकंठ गुप्ते हे मराठी समाजवादी कामगार नेते, लेखक आणि समाजवादाचे अभ्यासक होते. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या जीनिव्हा येथील अधिवेशनात त्यांनी लागोपाठ तीन वेळा भारतीय कामगारांच्या शिष्टमंडळात प्रतिनिधित्व केले. हिंद मजदूर सभेचेही ते काही काळ राष्ट्रीय सचिव होते. हिंद मजदूर सभेच्या पुढाकाराने कामगार चळवळीच्या संशोधनार्थ स्थापलेल्या मणिबेन कारा लेबर इन्स्टिट्यूट या संस्थेचे ते स्थापनेपासून संचालक होते. कामगार चळवळीच्या अनुषंगाने त्यांनी मराठी आणि इंग्लिश भाषांतून ग्रंथ, निबंध लिहिले.
1959: कर्मवीर भाऊराव पाटील यांचे निधन
शिक्षणाची ज्ञानगंगा गरीब, बहुजन वर्गापर्यंत पोहचवणारे कर्मवीर भाऊराव पाटील यांचे आजच्या दिवशी निधन झाले. सर्वसामान्य जनतेपर्यंत शिक्षणप्रसार करण्यासाठी त्यांनी रयत शिक्षण संस्था स्थापली. भाऊरावांनी मागास व गरीब मुलांना शिक्षण घेणे शक्य व्हावे म्हणून 'कमवा व शिका' ही योजना सुरू करून मोठे काम केले. महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाचे ते महत्त्वाचे सदस्य होते. त्यांचे व्यक्तिमत्त्व जातीभेदाच्या पलीकडे होते. महात्मा फूले यांच्या सत्यशोधकी विचारांचा प्रभाव भाऊराव पाटलांवर होता. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे त्यांनी जाणले होते. बहुजन समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार करताना विद्यार्थ्यांमध्ये बंधुता व समता रुजावी यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणातून समता व बंधुता याचे संस्कार विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न केला. भाऊरावांनी केवळ क्रमिक शिक्षणच नव्हे, तर समता, बंधुता, श्रमप्रतिष्ठा, सामाजिक बांधिलकी आदि मूल्यांची शिकवण विद्यार्थ्यांना दिली. कर्मवीर भाऊराव पाटील यांना त्यांनी केलेल्या सामाजिक कार्यासाठी पद्मभूषण या नागरी पुरस्काराने गौरवण्यात आले.
इतर महत्त्वाच्या घडामोडी:
1653: ताज महाल या ऐतिहासिक वास्तूचे बांधकाम जवळपास 22 वर्षानंतर पूर्ण झाले.
1936: इटलीने इथिओपिया देश बळकावला.
1955: पश्चिम जर्मनी या देशाने नाटोमध्ये प्रवेश केला.
1986: एव्हरेस्ट शिखर सर करणारा शेरपा तेलसिंग नोर्गे यांचे निधन