Akhil Bhartiy Marathi Sahitya Sammelan : नाशिकमध्ये 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडलं. साहित्यिकांसह साहित्य रसिकांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये सारस्वतांचा मेळा तीन दिवस चालला. या साहित्य संमेलनाच्या समारोपावेळी 95 व्या साहित्य संमेलनाचं ठिकाणही ठरलं आहे. आगामी मराठी साहित्य संमेलनाचा मान मराठवाड्याला मिळाला आहे. 95 वे मराठी साहित्य संमेलन लातूर जिल्ह्यातील उदगीरमध्ये पार पडणार आहे. चार महिन्याच्या आत पुढील साहित्य संमेलन होणार असल्याचीही माहिती नाशिक साहित्य संमेलनात देण्यात आली. तर पाच वर्षानंतर पुन्हा एकदा नाशिकमध्ये साहित्य संमेलन होणार आहे, ही असे अखिल भारती मराठी साहित्य महामंडळाचे विद्यमान अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी नाशिकध्ये सांगितलं.


साहित्य संमेलनात बोलताना कौतिकराव ठाले पाटील म्हणाले की, ‘आम्हा पदाधिकाऱ्यांना साहित्य संमेलनाचा आस्वाद घेता येत नाही. कारण कामं खूप असतात. काही कार्यक्रमांना हजेरी लावली. 10 वर्षाच्या बालकांपासून 80 वर्ष्याच्या वृद्धांपर्यंत सर्वानी भूमिका मांडली. 88 वर्षांचे रामदास भटकळ उपस्थित राहिले,त्यां च्या विषयी आदर वाढला आहे. ते आले नसते तर 2 तास काय करावे हा प्रश्न होता. साहित्य संमेलन काही कारणामुळे ज्या ठिकाणी घ्यायचे तिथे घेता येणार नाही, ही जाणीव झाल्यानं नवीन ठिकाण स्थळ शोधले.’ गिरीश कुबेर यांच्यावरील शाईफेक प्रकऱणावर बोलताना ते म्हणाले की,   ‘एखादं दुसरी विपरीत घटना घडली असं माझ्या कानावर आले, काय घडले मला माहित नाही. सर्व लोक सहिष्णु असतात असं नाही ,किरकोळ गालबोट लागले त्यांकडे दुर्लक्ष करावे.’ शरद पवार, चपळगावकर भाषा बद्दल बोलले. शिवाजी महाराजांनी व्यवहार कोष तयार केला होता, तसा कोष यशवंतराव चव्हाण यांनी केला, मात्र पुढे काही झाले नाही. जे ठराव संमत झाले ते बासनात गुंडाळून ठेवले जात नाहीत. ज्याज्या विभागाचे त्या-त्या विभागाकडे पाठविले जातात, असेही कौतिकराव ठाले पाटील म्हणाले.


दरम्यान, संमेलन आणि राजकारण होणं हे सूत्र नेहमीच ठरलेलं असतं. यंदाही संमेलनावरुन भरपूर राजकारण झालं. त्यातच कोरोनाचं संटक, दोन दिवस झालेला पाऊस, प्रकृतीच्या कारणामुळे संमेलनाध्यक्ष आणि मुख्यमंत्री संमेलनाला हजर न राहणे ,निमंत्रण पत्रिकेत नाव न टाकल्याच्या कारणावरून भाजपच्या नेत्यांची संमेलनाकडे पाठ आणि आज समारोपाच्या दिवशीच सकाळी-सकाळी कोरोनाचे दोन रूग्ण सापडले. शिवाय दुपारी जेष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून झालेली शाईफेक अशा अनेक वादासह आज सायंकाळी या संमेलनाची सांगता झाली. 


कोरोनाच्या संकटाची टांगती तलवार असताना संमेलन होणार की नाही इथपासून झालेली सुरूवात आणि शेवटी शाई फेकीचा झालेला प्रकार. यामुळे यंदाचं साहित्य संमेलन चर्चेचा विषय ठरलं. या दोन्ही घटनांमध्ये अनेक घटना घडत होत्या. असं असलं तरी महाराष्ट्रापासून देशभरातील साहित्यिकांसह साहित्य रसिकांनी संमेलनाला हजेरी लावली. त्यामुळे तीनही दिवस संमेलनस्थळी गर्दी पाहायला मिळाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या ओरोग्य यंत्रणेने चांगली तयारी केली होती. प्रवेशद्वारावरच आटीपीसीआर चाचणी करून अहवाल निगेटिव्ह आला तरच संमेलनाला प्रवेश देण्यात येत होता.