Marathi Sahitya Sammelan : "साहित्याच्या व्यासपीठावरून राजकारण होता कामा नये. राजकीय विचारांचा रंग देऊन यात मिश्रण करण्याची आवश्यकता नाही. राजकारणात साहित्यिकाला खूप मोठे महत्त्व आहे. राष्ट्रनिर्मिती करण्याचे आणि राष्ट्र घडवण्याचे काम उत्तम साहित्यिक करू शकतो, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ( Nitin Gadkari ) यांनी व्यक्त केले आहे. 


उदगीर येथे सुरू असलेल्या 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप आज नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख, स्वागताध्यक्ष संजय बनसोडे,  कार्याध्यक्ष  बसवराज पाटील नागरळकर, प्रमुख कार्यवाह रामचंद्र तिरुके, शिवसेनेच्या उपनेत्या नीलम गोऱ्हे, खासदार सुधाकर शृंगारे, आमदार संभाजी पाटील-निलंगेकर, आमदार रमेश कराड यांच्यासह संमेलनाध्यक्ष भारत सासणे, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक दामोदर मावजो, कौतिकराव ठाले-पाटील उपस्थित होते.


नितीन गडकरी म्हणाले, "राजकारणात साहित्य आणि संस्कृती समजणारा राजकारणी असेल तर तो उत्तम काम करू शकेल. त्या अनुषंगाने काही गोष्टी योजना तो राबवू शकतो. परंतु, आता समस्या अशी आहे की प्रत्येक क्षेत्रात काही चांगल्या आणि काही वाईट बाबी आहेत. शिक्षण संस्था या अनेक राजकारणी लोकांच्या  आहेत. मात्र, या शिक्षण संस्थांमधील शिक्षणातून देण्यात येणारे विचार हे राजकाण्यांच्या विचारावर  आधारित नसावेत. 


"जगातली सर्वात मोठी लोकशाही म्हणून आपल्या देशात विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपल्याला आहे. साहित्यातून, काव्यातून, इतिहासातून आपल्यावर जे संस्कार होतात त्याचा सखोल अभ्यास केला तर आपल्याला अनेक अनुभव येऊ शकतात. समाज कसा घडवायचा? विचार कसा तयार करायचा? हे विचार साहित्यातून मांडले पाहिजे. भारतीय जीवन सृष्टी मूल्याधिष्ठित आहे. हे सर्व संस्कार आणि समाजप्रबोधनाचे  विचार चित्रपटातून,  छोट्या-मोठ्या पुस्तकातील लेखातून सतत आपल्यापर्यंत येत राहतात, असे नितीन गडकरी यावेळी म्हणाले. 


"आपण महाराष्ट्रातून बाहेर जातो त्यावेळी आपल्याला मराठीचे मोठेपण लक्षात येते. मराठी साहित्य, मराठी नाटक, सुरेश भटांची गझल आणि विविध कविता आपल्याला आठवतात त्या वेळी मराठीचं मोठेपण आपल्याला लक्षात येतं. समाजात सर्व प्रकारचे राग आणि स्वर अस्तित्वात आहेत. जे साहित्य समाजाला दिशा देऊ शकते तेच स्वीकारायला हवे, असे नितीन गडकरी यावेळी म्हणाले. 


नितीन गडकरी म्हणाले, "आपल्याला विश्वात प्रथम क्रमांकाचे राष्ट्र व्हायचे असेल तर आपलं साहित्य, संस्कृती आणि विचार यावर अध्ययन केलं पाहिजे. भविष्यातील नीती तयार करणे आवश्यक आहे. कोणी कुठल्या विषयावर लिहावे हा त्याचा अधिकार आहे. मात्र देशाला प्रगतीच्या आणि विकासाच्या वाटेवर चालवायचे असेल तर त्या अनुषंगाने राष्ट्र निर्मितीचे विचार साहित्यातून रुजवणे आवश्यक आहे.