नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चाललाय त्यातच आता 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अवघ्या महिन्यावर येऊन ठेपले असतांनाच स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनाही कोरोनाची लागण झाल्याने संमेलनावर अनिश्चितेचे सावट आहे.
नाशिकला लाभलेला साहित्यिकांचा इतिहास यासोबतच लोकहितवादी मंडळाने संमेलन नाशिकमध्ये व्हावे यासाठी केलेला पाठपुरावा बघता यंदाचे 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 26 ते 28 मार्च दरम्यान गोखले एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणात रंगणार आहे. मात्र आता याच संमेलनावर अनिश्चितेचे सावट आहे आणि ह्याला कारण ठरतय ते म्हणजे कोरोना. जानेवारी महिन्यात नाशिक शहराची कोरोना मुक्तीकडे वाटचाल होत असल्याचं बघायला मिळत होते. मात्र आता कोरोनाने पुन्हा डोकं वर काढायला सुरुवात केली असून गेल्या दहाच दिवसात शहरात 1866 नागरिकांना कोरोनाची बाधा झाली असून प्रतिबंधित क्षेत्राची संख्याही 452 झाली आहे तर सध्या पंधराशे रुग्णावर उपचार सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाने कठोर पाऊले उचलण्यास सुरूवात केली असून विनामास्क फिरल्यास दंडाची रक्कम आता 1 हजार रुपये करण्यात आली आहे तर शहरात नाईट कर्फ्यूही लागू केला गेलाय.
एकीकडे शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असतांनाच दुसरीकडे नाशिकमध्ये होऊ घातलेल्या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनाही कोरोनाची लागण झाल्याने साहित्यिकांनी धसका घेतलाय.
छगन भुजबळ स्वागताध्यक्ष असल्याने शासकीय मदत तसेच यंत्रणा राबवण्यासाठी साहित्यिक वर्गाला कुठल्याही अडचणींचा सामना करावा लागत नव्हता. रविवारी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिक ठाले पाटील आणि नियोजन समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत भुजबळ फार्मवर छगन भुजबळ यांनी बैठक घेत तयारीचा सर्व आढावा घेतला होता, या बैठकीत मुख्यत्वे कोरोनाबाबतच्या खबरदारीवर सविस्तर चर्चाही पार पडली होती.
साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिक ठाले पाटील म्हणाले, आमच्याकडे आता वेळ खूप कमी आहे. त्यातच कोरोनामुळे दबावाखाली काम करावे लागते आहे. संमेलनाला उद्घाटक कोण बोलवायचे हे काम सध्या सुरु आहे समजा कोरोनामुळे किंवा इतर कारणांमुळे कोणी नकार दिला तर दुसरे कोणी येण्यास तयार होत नाही. त्यामुळे आम्ही उद्घाटक म्हणून निमंत्रण कोणाला दिले ते नाव आता जाहीर करत नाही.
संबंधित बातम्या :
साहित्य संमेलनातील वादाची पंरपरा कायम, संमेलनातील राजकीय हस्तक्षेपामुळे वादाला सुरुवात
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी जयंत नारळीकर यांची निवड