लातूर :  लातूरमधील कीर्ती ऑइल दुर्घटनाप्रकरणी मिलचे मालक आणि संचालक कीर्ती भुतडा, व्यवस्थापक एकनाथ केसरे, तांत्रिक प्रमुख मनोज क्षीरसागर, संचालक शिवराम गायकवाड यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

लातूरमधील किर्ती ऑईल मिलमध्ये टाकी साफ करताना नऊ कर्मचाऱ्यांचा विषारी वायूमुळे मृत्यू झाला. सोमवारी संध्याकाळी ही दुर्दैवी घटना घडली. मृतांमध्ये दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे.

सोड्याची टाकी साफ करण्यासाठी काही कर्मचारी उतरले होते. पण टाकीत तयार झालेल्या विषारी वायूमुळे कर्मचारी बेशुद्ध पडले. बराच वेळ होऊनही कर्मचारी बाहेर का आले नाही, हे पाहण्यासाठी आणखी काही कर्मचारी आत उतरले. परंतु तेही बाहेर आले नाही. याची माहिती मिळताच मदतकार्य सुरु करण्यात आलं. मात्र विषारी वायूमुळे आत जाता येत नव्हतं. अखेर रात्री नऊच्या सुमारात सर्व नऊ कर्मचारी मृतावस्थेत आढळले.

लातूरमध्ये टाकी साफ करताना विषारी वायूमुळे 9 जण अडकल्याची भीती


नरेंद्र टेकाळे, दगडू पवार, बळीराम पवार, रामेश्वर शिंदे, आकाश भुसे, परमेश्वर बिराजदार, मारोती गायकवाड, शिवाजी आतकरे, गुत्तेदार राम येरमे अशी मृतांची नावं आहेत.

सर्व कर्मचाऱ्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

दरम्यान, मृतांच्या कुटुंबीयांना योग्य ती मदत केली जाईल. तसंच मिल मालकावर कडक कारवाई करु, असं आश्वासन पालकमंत्री संभाजी निलंगेकर पाटील यांनी दिलं आहे.

कामगार मंत्र्यांना अडवलं
कामगार कल्याणमंत्र्यांच्या जिल्ह्यातीलच औद्योगिक वसाहतीत घडलेल्या या मृत्यूच्या तांडवाने उद्योग नगरी हादरली. साडेदहा वाजता मृतदेह बाहेर काढण्याची मोहीम सुरु झाली. मात्र रात्री 12.30 वाजेपर्यंत चार मृतदेह बाहेर आले. तर अन्य टाकीत होते. रात्री घटनास्थळी भेट दिलेल्या कामगार कल्याणमंत्र्यांना नातेवाईकांनी घेराव घालून 'असे किती बळी जाणार?' असा सवाल केला. याची चौकशी करुन योग्य ती कारवाई केली जाईल, या आश्वासनानंतरच लोकांनी त्यांची सुटका केली.

मृतदेह बाहेर काढताना अनंत अडचणी
रात्री बारा वाजेपर्यंत मृतदेह बाहेर काढण्याचे काम चालू होते. साडेबारा वाजता चार मृतदेह बाहेर काढण्यात आले. साडेदहा वाजता टाकी खालून फोडण्यास सुरुवात झाली होती. 25 फूट उंच आणि 25 फूट लांब असलेल्या या वेस्टेज सेटलमेंट टाकीच्या तळाला चोहोबाजूंनी छोटे-मोठे होल करुन विषारी वायू, गाळ बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरु होती. तीन-चारवेळा टाकीत पाणी सोडून त्यातील विषारी वायू, गाळ कमी करण्याची प्रक्रिया सुरु होती. व्यक्ती गुदमरणार नाही, अशी स्थिती झाल्यानंतरच टाकीतून मृतदेह बाहेर काढणार, अशी भूमिका मिल व्यवस्थापनाने घेतली. त्यामुळे मृतदेह बाहेर काढण्यास विलंब होत होता.