9 October In History :  आजचा दिवस भारतीय समाजकारण, राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. मराठी पत्रकार, समाजसुधारक आणि इतिहासलेखक गोपाळ हरी देशमुख ऊर्फ लोकहितवादी यांचा आज स्मृतीदिन आहे. त्याशिवाय, उत्तर भारतात दलितांच्या राजकीय चळवळीला एका उंचीवर नेणारे बहुजन समाजाचे संस्थापक कांशीराम यांचाही स्मृतीदिन आहे. अभिनेते राजकुमार यांचा आज जन्मदिन आहे. 


जागतिक टपाल दिन 


लोकांच्या विश्वास संपादन करणाऱ्या पोस्टल सेवेचा 9 ऑक्टोबर हा स्थापना दिवस. हा दिवस जागतिक टपाल दिन किंवा 'वर्ल्ड पोस्ट डे' हा जगभरातून साजरा केला जातो. युनिवर्सल पोस्टल युनियनची (युपीयु) उभारणी करण्यासाठी 1874 मध्ये स्विर्झलंडची राजधानी 'बर्न' येथे 22 देशांनी मिळून करारावर सही केली होती. 1 जुलै 1876 ला भारत 'युनिवर्सल पोस्टल युनियन' चा सदस्य होणारा पहिला आशियाई देश ठरला. टोकियोत 1969 मध्ये आयोजित केल्या गेलेल्या संमेलनात जागतिक टपाल दिनाची घोषणा करण्यात आली होती. पोस्टाच्या कामाची माहिती व्हावी, जनजागृती होवून पोस्टाचे महत्व वाढीस लागावे यानिमित्ताने 9 ऑक्टोबरपासून 'पोस्टल विक' पाळला जातो.



1892 : गोपाळ हरी देशमुख ऊर्फ लोकहितवादी यांचे निधन 


मराठी पत्रकार, समाजसुधारक आणि इतिहासलेखक गोपाळ हरी देशमुख ऊर्फ लोकहितवादी यांचा आज स्मृतीदिन.  प्रभाकर नावाच्या साप्ताहिकातून लोकहितवादी या टोपण नावाने त्यांनी समाजसुधारणाविषयक शतपत्रे लिहिली. लोकहितवादींनी समाजहिताला प्राधान्य देऊन सर्वांगीण सामाजिक सुधारणा घडवून आणण्यासाठीचा आग्रह धरला होता. त्यांचा जातीव्यवस्था, वर्णभेद याला विरोध केला होता. 


लोकहितवादींनी समाजहिताला प्राधान्य देऊन सर्वांगीण सामाजिक सुधारणा घडवून आणण्यासाठीचा आग्रह धरला होता.आपल्या समाजातील दोषांवर त्यांनी टीका केली समाजातील अनिष्ट रूढी व परंपरा दूर करून सर्वांगीण सामाजिक प्रगतीचा विचार सर्वांनी केला पाहिजे समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन स्वतःची उन्नती साधावी. अंधश्रद्धा भोळ्या समजुती व संकुचित विचार यांचा त्याग करावा असे ते सांगत. भारतीय समाजातील जातीव्यवस्था ही समाजाच्या अधोगतीला कारणीभूत झालेली आहे असे त्यांचे मत होते. म्हणून त्यांचा जातीव्यवस्था, वर्णभेद याला विरोध होता. लोकहितवादींनी बालविवाह, हुंडा, बहुपत्नीत्वाची पद्धती, अशा अनिष्ट प्रथांवर टीका केली. स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने अधिकार मिळाले पाहिजेत. त्यांना शिक्षण व विवाह याबाबत स्वातंत्र्य असावे विधवांना पुनर्विवाह करण्याचा अधिकार असावा, असे विचार त्यांनी स्पष्टपणे मांडले होते. 


1848 ते  1850 या काळात त्यांनी 108 छोटे छोटे निबंध लिहिले. हेच निबंध लोकहितवादींची 'शतपत्रे' नावाने ओळखले जातात. या शतपत्रांच्या माध्यमातून त्यांनी समाजसुधारणाविषयक विचार समाजासमोर मांडले. ही शतपत्रे 'प्रभाकर' या साप्ताहिकातून प्रसिद्ध झाली. धार्मिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, वाङ्मयीन, ऐतिहासिक इत्यादी विषयांवर त्यांनी लहानमोठे असे सुमारे 39 ग्रंथ लिहिले, दोन नियतकालिके चालविली, आणि ज्ञानप्रकाश व इंदुप्रकाश ही नियतकालिके काढण्याच्या कामी पुढाकार घेतला. लोकहितवादींनी अनेक उत्कृष्ट इंग्रजी ग्रंथांचे मराठीत भाषांतर केले. मराठीतून लेखन करणारेही ते पहिलेच अर्थतज्ज्ञ. ‘लक्ष्मीज्ञान‘ या ग्रंथाद्वारे त्यांनी अ‍ॅडम स्मिथ‘प्रणीत अर्थशास्त्र वाचकांसमोर आणले. 



1926 : चित्रपट अभिनेता कुलभूषण पंडित अर्थात राजकुमार यांचा जन्म


आपल्या खास संवादशैलीसाठी प्रसिद्ध असलेले अभिनेते राजकुमार यांचा आज जन्मदिन. सध्या पाकिस्तानमध्ये असलेल्या बलुचिस्तानमध्ये कुलभूषण पंडित यांचा जन्म झाला. चित्रपटसृष्टीत काम करताना त्यांनी राजकुमार हे नाव निवडले. कुलभूषण पंडित यांनी आपले पदवी शिक्षण पूर्ण करून मुंबईच्या माहिम पोलीस स्टेशनमध्ये इन्स्पेक्टर म्हणून काम करत होते. एकदा निर्माते बलदेव दुबे काही महत्त्वाच्या कामाने पोलीस स्टेशनला आले आणि त्यांना कुलभूषण यांच्या बोलण्याची शैली फारच आवडली. त्यांनी लगेचच त्यांच्या ‘शाहीबाजार’ या चित्रपटात काम करण्यासाठी कुलभूषण यांना विचारले. त्यानंतर त्यांनी पोलीस सेवेतून राजीनामा देऊन चित्रपटसृष्टीत प्रवेश केला.


सुरुवातीला, त्यांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरले, त्यानंतर मेहबूब खान यांच्या 1957 मध्ये प्रदर्शित झालेल्या मदर इंडिया या चित्रपटात राजकुमार गावातील एका छोट्या शेतकऱ्याच्या भूमिकेत दिसले. त्यांच्या या भूमिकेचे कौतुक झाले. 1965 मध्ये प्रदर्शित झालेल्या काजल या चित्रपटापासून राजकुमार एक सुपरस्टार अभिनेता म्हणून उदयास आले. 'वक्‍त' या चित्रपटातील त्यांचे संवाद चांगलेच गाजले. हमराज (1967), नीलकमल (1968), मेरे हुजूर (1968), हीररांझा (1970), पाकीजा (1971) या चित्रपटांतून त्यांनी त्यांच्या इमेजला साजेशा नसलेल्या भूमिका साकारल्या. 1980 मध्ये बुलंदी चित्रपटात चरित्र भूमिका करण्याचे धाडस त्यांनी केलेच. यानंतर कुदरत (1981), धर्मकांटा (1982), शरारा (1984), राजतिलक (1984), एक नयी पहेली (1984), मरते दम तक (1987,), सूर्या (1989), जंगबाज (1989), पुलिस पब्लिक (1990) आदी चित्रपटही हिट ठरले. 1991 मध्ये प्रदर्शित झालेल्या सौदागर या चित्रपटात त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली. दिलीपकुमार आणि राजकुमार या दोन दिग्गज अभिनेत्यांच्या अभिनयाची जुगलबंदी चित्रपटात दिसून आली. 



1970 : मुंबईतील भाभा अणु संशोधन केंद्रात युरेनियम 233 चे उत्पादन


 भाभा अणुसंशोधन केंद्र  1957 मध्ये मुंबईजवळ ट्रॉम्बे येथे अणुऊर्जा केंद्र म्हणून त्याची स्थापना करण्यात आली. 1967 मध्ये त्याचे संस्थापक डॉ. होमी जहांगीर भाभा यांच्या स्मरणार्थ त्याचे नाव बदलून 'भाभा' करण्यात आले. अणु संशोधन केंद्र, BARC'. अणुऊर्जा आणि इतर संबंधित विषयांवर संशोधन आणि विकास कार्यासाठी हे मुख्य राष्ट्रीय केंद्र आहे.  9 ऑक्टोबर 1974 रोजी मुंबईतील भाभा अणु संशोधन केंद्रात युरेनियम 233 चे उतपन्न करण्यात आले.  



1990 :  पहिला स्वदेशी बनावटीचा तेल टँकर 'मोतीलाल नेहरू' भारतीय शिपिंग कॉर्पोरेशनला सुपूर्द


कोची शिपयार्डने 1990 मध्ये पहिला स्वदेशी ऑईल टँकर बनवला होता. कोची शिपयार्डने 43 महिन्यांत देशातील पहिला तेल टँकर जगासमोर सादर केला. तेल टँकर कंपनीने मार्च 1987 मध्ये बांधण्यास सुरू केला होता आणि नोव्हेंबर 1989 मध्ये तो पूर्णपणे तयार झाला होता. त्यानंतर 8 ऑक्टोबर 1990 रोजी पहिला स्वदेशी बनावटीचा तेल टँकर 'मोतीलाल नेहरू' भारतीय शिपिंग कॉर्पोरेशनला सुपूर्द करण्यात आला.  



2006 :  बहुजन समाज पक्षाचे संस्थापक कांशीराम यांचे निधन 


बामसेफ,  बहुजन समाज पक्षाचे संस्थापक कांशीराम यांचा आज स्मृतीदिन. भारतीय राजकारणात कांशीराम यांनी मांडलेल्या वैचारिक सिद्धांतावर मोठा उहापोह झाला. त्यांना वगळून बहुजनवादाची, आंबेडकरी चळवळीची मांडणी अपूर्ण आहे. 


पंजाब विद्यापीठातून बी.एस्सी. चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते  पुण्यात उच्च ऊर्जा पदार्थ संशोधन प्रयोगशाळेत (तेव्हाच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचाच घटक) रुजू झाले. त्या कालखंडात 1965 च्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मदिनाच्या सुट्टीवरून सुरू झालेल्या मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला. कांशीराम यांच्या जीवनातील चळवळीच्या टप्प्यास येथून सुरुवात झाली. 


1978  साली कांशीराम यांनी बामसेफ ("बॅकवर्ड ॲन्ड मायनॉरिटी कम्युनिटीज एम्प्लॉइज फेडरेशन" या संघटनेची स्थापना केली. ही संघटना बिगरराजकीय, बिगरधार्मिक स्वरूपाची होती. 


काँग्रेससोबत राहून दलित चळवळीचे मोठे नुकसान झाले असल्याचे त्यांनी म्हटले. दलितांची एक स्वतंत्र चळवळ असावी, त्यांनी राजकारणाची दिशा ठरवावी या मताचे कांशीराम होते. 1982 मध्ये त्यांनी लिहिलेल्या 'चमचा युग' या पुस्तिकेने खळबळ उडाली होती. 


1981 सालापासून त्यांनी दलितांना एकीकरण साधण्याच्या हेतूने प्रयत्न आरंभले. त्यावेळी त्यांनी डीएस4 अर्थात 'दलित शोषित समाज संघर्ष समिती'ची स्थापना केली.  यातून 1984 साली त्यांनी बहुजन समाज पक्ष स्थापला. 


बहुजन समाज पक्षास उत्तर प्रदेशात बऱ्यापैकी यश कमवता आले. कांशीराम यांनी संघटना, पक्ष बांधणीच्या सुरुवातीच्या काळात सायकलवरून प्रवास केला. कांशीराम यांनी साली 10 व्या लोकसभेत होशियारपूर मतदारसंघाचे प्रतिनिधी म्हणून निवडून गेले. पुढे 1996 मध्येही ते पुन्हा निवडून गेले.  


उत्तर प्रदेश आणि उत्तर भारतात बहुजनवाद, दलित चळवळीला नवा आयाम देण्यात कांशीराम यांचा मोठा वाटा राहिला आहे. त्यांच्या राजकीय भूमिकांवरून अनेक प्रश्न उपस्थित झाले. भाजपसोबत त्यांनी युती करत मायावती यांना मुख्यमंत्री केले होते. त्याआधी समाजवादी पक्षाचे मुलायम सिंह यादव यांच्यासोबत आघाडी केली होती. 



2012 : मलाला युसूफझाईवर हल्ला  


पाकिस्तानच्या मलाला युसूफझाईवर 9 ऑक्टोबर 2012 रोजी तालिबान्यांनी हल्ला केला होता. मलाला त्यावळी अवघ्या 15 वर्षांची होती. ती त्यावेळी पाकिस्तानात मुलींच्या शिक्षणाबाबत जनजागृती करण्याचं काम करत होती.  पाकिस्तानात मुलींच्या शिक्षणाचा पुरस्कार करणाऱ्या मलाला युसुफझाईवर तालिबान्यांनी हल्ला केला आणि गुल मकईच्या नावाने जगभरातील आवाज दाबण्यासाठी तिच्या डोक्यात गोळी घालून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला. शाळेतून घरी परतणाऱ्या मलालावर झालेला हा हल्ला जीवघेणा होता. पण या जीवघेण्या हल्ल्यातून मलाला बचावली आणि पुढेही तीने आपले काम सुरूच ठेवले.  ब्रिटनमध्ये प्रदीर्घ उपचारानंतर ती बरी झाली. नोबेल शांतता पारितोषिक मिळवणारी सर्वात तरुण मलाला दहशतवाद्यांच्या मुलांना देखील शिक्षण देण्याच्या बाजूने आहे.  


इतर महत्त्वाच्या घटना : 


1891 : उद्योजक, साहित्यिक व चित्रकार शंकरराव वासुदेव किर्लोस्कर यांचा जन्म. 
1924 : भारतीय कवि आणि स्कॉलर थिरूनलूर करुणाकरन यांचा जन्म
1955: हार्मोनियम वादक, अभिनेते आणि संगीतकार, नाट्यसंगीताचे पहिले शिल्पकार, पहिल्या बोलपटाचे संगीत दिग्दर्शक, संगीत क्षेत्रातील पहिले सौंदर्य मीमांसक, संगीतिकांचे प्रवर्तक गोविंदराव टेंबे यांचे निधन
1960 : नेटफ्लिक्स चे सहसंस्थापक रीड हेस्टिंग्स यांचा जन्म
1987: कथकली नर्तक गुरू गोपीनाथ यांचे निधन. 
1998: छायालेखक (Cinematographer) जयवंत पाठारे यांचे निधन
2015: भारतीय संगीतकार आणि दिग्दर्शक रवींद्र जैन यांचे निधन.