मुंबई: आज जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जात आहे. तसं पाहिलं तर महिला दिन साजरा करण्यासाठी कोणा एका विशेष दिवसाची आवश्यकता नाही. कारण दरदिवशी महिलांचं महत्त्वं हे कायम तितकंच आणि महत्त्वाचं असतं. पण महिलांच्या योगदानाची दखल लक्षात घेऊन जागतिक स्तरावर 8 मार्च हा दिवस महिला दिन म्हणून साजरा करण्याचं जाहीर करण्यात आलं. आजच्याच दिवशी मलेशियन एअरलाईन्सचे एक विमान (Malaysia Airlines Flight 370) गायब झालं होतं. या विमानात 227 प्रवासी होते. हे विमान नेमकं कुठं गायब झालं हे अद्याप कुणालाही माहिती नाही. या घटनांसह इतरही काही महत्त्वाच्या घटनांचा साक्षीदार हा 8 मार्च दिवस आहे.


1702: ब्रिटनची सत्ता क्विन अॅनी यांच्याकडे


इंग्लंडचा राजा विल्यम तिसरा याच्या मृत्यूनंतर क्विन अॅनीने ब्रिटनची सत्ता हाती घेतली. 


1921: स्पेनचे पंतप्रधान एडूआर्डो दॅतो यांची हत्या


आजच्याच दिवशी, 8 मार्च 1932 रोजी स्पेनचे पंतप्रधान एडूआर्डो दॅतो (Eduardo Dato) यांची संसद भवनाातून बाहेर पडताना हत्या करण्यात आली. एडूआर्डो दॅतो हे स्पेनचे तीनवेळा पंतप्रधान राहिले होतं. 


1942: जपानी सैन्याने बर्मामधील रंगून शहर ताब्यात घेतलं


दुसऱ्या महायुद्धात जपानी सैन्याने दक्षिण आशियामध्ये मोठी मुसंडी मारली. भारताचे सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली आणि त्यांनी जपान आणि जर्मनीच्या सैन्यासोबत हातमिळवणी केली. त्यानंतर आझाद हिंद सेना आणि जपानी सैन्याने दक्षिण आशियामध्ये चढाई सुरू केली. 1942 साली जपानी सैन्याने बर्मा म्हणजे आताचे म्यानमारमध्ये प्रवेश केला. 8 मार्च 1942 रोजी जपानी सैन्याने बर्माची राजधानी रंगून शहर ताब्यात घेतलं.  


1953: राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचा जन्म


राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेत्या वसुंधराराजे शिंदे (Vasundhara Raje Shinde) यांचा जन्म 8 मार्च 1953 रोजी ग्वाल्हेरच्या राजघराण्यात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जिवाजीराव शिंदे असून माधवराव शिंदे यांच्या त्या बहिण आहेत. त्यांचा विवाह धौलपूरच्या जाट राजघराण्यात झाला होता. वसुंधराराजे शिंदे या राजस्थानमधील भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये सलग दहा वर्षे मुख्यमंत्री होत्या. सध्या त्या भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा आहेत. 


1975: आंतरराष्ट्रीय महिला दिनाची घोषणा (International Women's Day)


महिला दिनानिमित्त नातेवाईक, मित्र आणि महिला सहकाऱ्यांना शुभेच्छा संदेश पाठवण्याची तसेच कार्ड, चॉकलेट, फुले आणि इतर भेटवस्तू देण्याची तयारी जोरात सुरू आहे. तथापि आंतरराष्ट्रीय महिला दिन का आणि कधीपासून साजरा केला जातो हे लोकांना फारसे माहिती नाही. वास्तविक 1908 मध्ये महिला कामगार चळवळीमुळे महिला दिन साजरा करण्याची परंपरा सुरू झाली. या दिवशी, 15,000 महिलांनी न्यूयॉर्क शहरात कामाचे तास कमी करणे, चांगले वेतन आणि इतर काही हक्कांच्या मागणीसाठी निदर्शने केली. एका वर्षानंतर अमेरिकेच्या सोशलिस्ट पार्टीने हा दिवस पहिला राष्ट्रीय महिला दिन म्हणून घोषित केला. 1910 मध्ये कोपनहेगन येथे कामगार महिलांची एक आंतरराष्ट्रीय परिषद भरली होती, ज्यामध्ये हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा करण्याची सूचना करण्यात आली आणि हळूहळू हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून लोकप्रिय झाला. संयुक्त राष्ट्र संघाने 1975 मध्ये 8 मार्च या दिवसाला अधिकृतरित्या आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून मान्यता दिली. 


1985: बेरुतमध्ये बॉम्बस्फोट, 80 ठार


लेबनॉनची राजधारी बेरूतमध्ये 8 मार्च 1985 रोजी एका मशिदीजवळ एका कारमध्ये बॉम्बस्फोट झाला. त्यामध्ये 80 लोक ठार झाले आणि 175 हून अधिक लोक जखमी. मशिदीत नमाज पठणासाठी लोक जमले होते त्यावेळी दहशतवाद्यांनी हा हल्ला घडवून आणला. 


2014: मलेशिया एअरलाईन्सचे विमान गायब (Malaysia Airlines Flight 370) 


क्वालालंपूरहून बीजिंगला जात असताना मलेशिया एअरलाइन्सचे विमान (Malaysia Airlines Flight 370) बेपत्ता झाले. अनेक प्रयत्न करूनही ते सापडले नाही. विमानात 227 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर्स होते. ते शोधण्याचे प्रयत्न 2017 मध्ये बंद झाले.


8 मार्च 2014 रोजी विमानाने क्वालालंपूर येथून रात्री 12.41 वाजता वाजता उड्डाण केले आणि त्याच दिवशी 06.30 वाजता चीनची राजधानी बीजिंग येथे पोहोचणार होते. सुबांग एअर ट्रॅफिक कंट्रोल सेंटरने 02:40 वाजता कळवले की विमानाचा केंद्राशी संपर्क तुटला आहे. 09:30 वाजता व्हिएतनाम इमर्जन्सी रेस्क्यू सेंटरला हरवलेल्या विमानातून एक सिग्नल मिळाला जो आपत्कालीन लोकेटर ट्रान्समीटर असल्याचे मानले जात होते. हे विमान चीनच्या हवाई हद्दीत गेले नाही आणि ते व्हिएतनामच्या हवाई हद्दीत कोसळल्याचं सांगितलं जातं. चीनच्या नियंत्रण केंद्राशीही संपर्क होऊ शकला नाही. या विमानात चीन, मलेशिया, इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलियासह 14 वेगवेगळ्या देशांचे प्रवासी होते.


2020: कोरोना रुग्णांची संख्या एक लाखाहून जास्त (Coronavirus)


जगभरात कोरोना विषाणूचा प्रसार सुरू झाल्यानंतर 8 मार्च 2020 रोजी पहिल्यांदाच रुग्णसंख्येने एक लाखाचा टप्पा पार केला. तीन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी जगभरातील रुग्णसंख्या 1,05,800 वर पोहोचली आहे. त्यावेळी हा विषाणू 95 देशांमध्ये पोहोचला. एकट्या चीनमध्ये त्याची 80,695 प्रकरणे होती. भारतात बाधितांची संख्या 39 इतकी झाली होती.