पिंपरी-चिंचवड : तरुण पिढीला लाजवणारे आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रेरणा देणारे एक आजोबा पिंपरीत राहतात. 85 वर्षांचे गोपाळ लेले हे तरुण आजोबा हिमालयातील रुपकुंड सर करणार आहेत. येत्या एक ऑक्टोबरला ते हिमालयाच्या दिशेने आपली पावलं टाकणार आहेत.


अनेक भारतीय परदेश पाहायला जातात, मात्र गोपाळ लेलेंना आपल्या देशाचा अभिमान असल्यानं ते देशाची संस्कृती ट्रेकिंगद्वारे अनुभवतात. हिमालय सर करण्याची ही त्यांची तिसरी वेळ आहे. आजवर त्यांनी कळसुबाई, हरिश्चंद्र गड, कास पठार ते महाबळेश्वर, कात्रज ते सिंहगड अश्या सह्याद्री पर्वतरांगाही पिंजून काढल्या आहेत.

वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी हिमालयातील रुपीन पास हा ट्रेक यशस्वीरित्या पार केल्यामुळे लिम्का बुकलाही त्यांची दखल घ्यावी लागली. हे यश मिळण्यामागची कारणंही तितकीच महत्त्वाची आहेत.

अभियांत्रिकीची पदवी घेतल्यानंतर ऐन उमेदीत त्यांनी नोकरीवर भर दिला, मात्र वयाच्या सहाव्या वर्षांपासून सुरु केलेला व्यायाम त्यांनी अखंडितपणे सुरु ठेवला आणि साठीत पाऊल पडल्यानंतर गंध नसलेल्या ट्रेकिंगला सुरुवात केली. म्हणूनच तरुण वयात म्हातारपण आलेले गोपाळकाका म्हातारपणी तरुण झाले. त्यामुळे ते तरुणांना मोलाचा सल्ला देतात.

गोपाळ काकांची तब्येत गेल्या वर्षी मात्र चांगलीच खालावली होती. अगदी डॉक्टरांनी तर त्यांना 'कुछ दिनोंका मेहमान' असल्याचं सांगितलं होतं. मात्र चारच महिन्यात ते पुन्हा ठणठणीत झाले आणि आता हिमालय सर करायला निघाले आहेत. त्यांची ही जिद्द पाहून त्यांची पत्नीदेखील अवाक झाली आहे. त्यामुळेच यंदाही ते हिमालय सर करण्याची मोहीम फत्ते करतील असा आशावाद पत्नीसह मित्रांनी ही व्यक्त केला आहे.

गोपाळ काका आजही त्यांच्या स्वतःच्या कंपनीत जाऊन काम करतात. त्यांचा हा दांडगा उत्साह विशीतील तरुणांनाही लाजवेल असाच आहे, मात्र त्यांची ही जिद्द आणि चिकाटी अनेक ज्येष्ठ नागरिकांना प्रेरणा देणारी ठरेल यात शंका नाही. गोपाळ लेलेंच्या या आदर्श प्रवासाला 'माझा'चा सलाम आणि हिमालय सर करण्यासाठी शुभेच्छा.