अमरावती : नागपूर-मुंबई विदर्भ एक्स्प्रेसमध्ये आठ लाख रुपयांसह तीन तोळे सोनं जप्त करण्यात आलं आहे. मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास रेल्वे पोलिसांनी ही कारवाई करत एका आरोपीला अटक केली. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ही रक्कम सापडल्याने, त्या अनुषंगाने तपास सुरु आहे.


वर्ध्यातून उमेश सूर्यवंशी नावाचा व्यक्ती मंगळवारी रात्री 8.30 वाजता विदर्भ एक्स्प्रेसमध्ये 3 बॅग घेऊन बसला. या बॅगमध्ये हवाल्याची रोख रक्कम असल्याची माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वर्धा पुलगावदरम्यान उमेश यांच्याकडील बॅग तपासल्या असता, त्यात 8 लाख 10 हजार रुपये रोख आणि 3 तोळे सोने (अंदाजे किंमत 90 हजार रुपये) रेल्वे पोलिसांना सापडले. बडनेरा रेल्वे स्थानकावर गाडी येताच रेल्वे पोलिसांनी रोकड आणि आरोपीला ताब्यात घेतलं असून पुढील तपास बडनेरा पोलिस करत आहेत.

आपण कुरिअरचं काम करत असल्याचं त्याने पोलिसांना सांगितलं. मात्र, एवढी मोठी रक्कम कोणाची आहे आणि ती मुंबईला कोणासाठी घेऊन जात होता याची शोध सध्या रेल्वे पोलिस घेत आहेत.

तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील सीमांवर नाकाबंदी करुन वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने गुरुवारी (28 मार्च) रात्री 8.30 वाजता अकोला टी-पॉईंटवर नाकाबंदीदरम्यान, कारने अमरावतीला येणाऱ्या बांधकाम कंत्राटदाराकडून 4 लाख 2 हजारांची रोकड जप्त करण्यात आली. ही रोकड अकोला येथील बांधकाम कंत्राटदाराची असल्याचं कळतं. पोलिसांनी कार आणि रोकड जप्त केली आहे.