पुणे : पुण्याच्या बालेवाडी परिसरातील बांधकाम सुरु असलेल्या एका इमारतीचा सोळाव्या मजल्याचा स्लॅब कोसळल्याने आठ मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. आज सकाळी ही घटना घडली.

 

बालेवाडीच्या किर्लोस्कर कमिन्स ऑफिससमोरील या इमारतीचं काम सुरु होतं. मात्र त्याचवेळी सोळाव्या मजल्याचा स्लॅब कोसळला. या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली दबल्याने आठ जणांचा मृत्यू झाला, तर पाच जण जखमी आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.

 

पार्क ग्रांजर आणि पार्क एक्स्प्रेस नावाच्या सोसायटीच्या साईट्स होत्या. त्यातील पार्क एक्स्प्रेस या इमारतीचा स्लॅब कोसळला. अरविंद जैन, श्रवण अगरवाल या दोन बिल्डर्सच्या प्राईड पर्पल बांधकाम कंपनीचे हे दोन्ही प्रोजेक्ट्स आहेत.