सांगली : सध्या सांगली, मिरज आणि कुपवाड शहरांमधील वातावरण महानगरपालिकेच्या निवडणुकीने ढवळून निघत आहे. प्रत्येक पक्ष आपली ताकद पणाला लावून जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याचा प्रयत्न करत आहेत. तिकीट न मिळल्याने नाराज उमेदवाराची देखील संख्या या निवडणुकीत जास्त दिसत आहे. मात्र या सगळ्या अपक्ष उमेदवारांमध्ये मिरजमधील प्रभाग क्रमांक 20 मधून अनुसूचित जातीच्या उमेदवार म्हणून उभ्या असलेल्या सरस्वती गणपती कोळी यांची या निवडणुकीत बरीच चर्चा आहे.
कपाळाला भलं मोठं लावलेलं कुंकू आणि नववारीत तयार होऊन 73 वर्षीय सरस्वती गणपती कोळी घराबाहेर पडल्या आहेत. या आजीबाईंची सारी लगबग प्रचारासाठीची आहे. आता तुम्ही म्हणाल कुणाचा प्रचार, तर या आजीबाई सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेच्या उमेदवार आहेत. बसला ना धक्का. पण हे खरंय!
मिरजमधील प्रभाग क्रमांक 20 मधून अनुसूचित जातीच्या अपक्ष उमेदवार म्हणून या आजीबाई उभ्या आहेत. नुसता या आजीबाई उभ्या नाहीत तर या आजीबाईंनी आपल्या प्रभागात प्रचाराचा धुरळा उडवायला सुरुवात केली आहे. या प्रचारात त्यांना घरातील सदस्यांपासून लहानग्यांची, शेजारी-पाजाऱ्यांची साथ मिळालीय. सरस्वती आजीबाईंच्या बहीण देखील हिरीरीने प्रचारात सहभगी आहेत.
सरस्वती आजीबाईंना राजकारणाचा वारसा देखील लाभलाय. माजी आमदार आणि स्वातंत्र्यसैनिक कै. गणपतराव कोळी यांच्या त्या बहीण आहेत. वयाची 73 ओलांडली तरी आज त्या शेती कामांपासून घरातील सगळी कामं करतात. आपल्या भावाची प्रेरणा घेत समाजासाठी काही तरी काम करण्याची त्यांची जिद्द आहे. अनुसूचित जमातीमधील स्थानिक आदिवासी लोकांना प्रतिनिधित्व करायला मिळावे म्हणून या आजीने या जातीचे आरक्षण पडलेल्या ठिकाणी आपली उमेदवारी दाखल केली आणि प्रचाराला सुरुवात केली.
या आजीबाईंचं निवडणूक चिन्ह आहे ‘गॅस सिलेंडर’. आज या आजीबाई घरोघरी भेट देऊन आपल्याला निवडून द्यावे अशी विनंती करत आपल्या निवडणूक चिन्हाचा प्रचार करत आहेत. या आजीबाईंचा प्रचारातला उत्साह पहिला तर बरेच जण तोंडात बोटे घालतात. एक 73 वर्षीय आजी चालत मत मागत फिरते याचे त्या प्रभागामधील मतदारांना देखील कौतुक वाटते. यातील महिला मतदारांनी या आजीबाईंना निवडून आणून महापालिकेत पाठवायचे, असा निर्धार केला आहे.
सांगली महापालिका निवडणुकीत 73 वर्षीय आजीबाईंची एंट्री
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
20 Jul 2018 06:08 PM (IST)
सरस्वती आजीबाईंना राजकारणाचा वारसा देखील लाभलाय. माजी आमदार आणि स्वातंत्र्यसैनिक कै. गणपतराव कोळी यांच्या त्या बहीण आहेत. वयाची 73 ओलांडली तरी आज त्या शेती कामांपासून घरातील सगळी कामं करतात. आपल्या भावाची प्रेरणा घेत समाजासाठी काही तरी काम करण्याची त्यांची जिद्द आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -