नागपूर : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा एक निकष राज्य सरकारने बदलला आहे. कटुंबनिहाय कर्जमाफीऐवजी व्यक्तिनिहाय कर्जमाफी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याच्या सहकारमंत्र्यांनी सभागृहात यासंदर्भात निवेदन दिले.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कुटुंबनिहाय दीड लाखाच्या मर्यादेची कर्जमाफीची अट होती. त्यानुसार कुटुंबाची थकबाकीची एकूण रक्कम दीड लाखांपेक्षा जास्त असल्यास त्यांना दीड लाखांवरील रक्कम आगाऊ भरल्यानंतर सरकारकडून दीड लाखांचा कर्जमाफीचा लाभ देण्याचा निकष होता.
आता सरकराने याप्रकरणी कुटुंबाची अट शिथील केली असून, कुटुंबातील अर्ज केलेल्या प्रत्येक कर्जदारास वैयक्तिक दीड लाखांपर्यंत कर्जमाफीचा लाभ देण्यात येईल.
त्यामुळे आता कर्जमाफीच्या योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबातील पती, पत्नी, मुले यांना प्रत्येकी दीड लाखांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे.
तसेच, एकरकमी परतफेड योजनेत पात्र झालेल्या शेतकऱ्यांना भरावी लागणारी रक्कम कमी होऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ होणार आहे, असा सरकारचा दावा आहे.
निकष बदलल्याने आता सुमारे शेतकरी कर्जदारांची संख्या सुमारे 5 लाखाने वाढणार आहे. तर आत्तापर्यंत 38 लाख 53 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर एकूण 15 हजार 771 कोटी निधी जमा झाला आहे, अशी माहिती सरकारकडून देण्यात आली आहे.